
सोलापूर शहर हे ‘स्मार्ट सिटी’च्या यादीत आहे. त्यामुळे गेल्या तीन वर्षांपासून सोलापूर शहरात स्मार्ट सिटीचे काम सुरू आहे. मात्र, संथ गतीने सुरू असलेल्या स्मार्ट सिटीच्या कामकाजावर अनेक नागरिक नाराजी व्यक्त करीत आहेत. शहरात चौकाचौकात खड्डे खोदून ठेवण्यात आले आहेत. ‘नगरोत्थान योजने’तून ड्रेनेजचे काम सुरू आहे. पण शहरातील कन्ना चौकात चक्क पिण्याच्या पाइपलाइनवरच ड्रेनेज चेंबर बांधल्याने नागरिकांनी संताप व्यक्त करीत काम थांबविले आहे.
देशभरात 100 शहरांना ‘स्मार्ट सिटी’चा दर्जा देण्यात आला आहे. सोलापूर शहराचाही त्यात समावेश आहे. मात्र, सोलापुरात स्मार्ट सिटीचे कामकाज कासवगतीने सुरू आहे. शहरात विविध ठिकाणी, मुख्य चौकात रस्ते खोदण्यात आले आहेत. त्यामुळे सोलापूर शहरातील वाहतूक पूर्णपणे खोळंबली आहे. तसेच 10 जून रोजी स्मार्ट सिटीचे कामकाज करणाऱया ट्रक्टरखाली सापडून समर्थ भास्कर या 15 वर्षीय अल्पवयीन मुलाचा मृत्यू झाला आहे. आणखीन त्यात भर म्हणजे, पिण्याच्या पाइपलाइनवरच ड्रेनेज चेंबर बांधले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.
पिण्याच्या पाइपलाइनवर ड्रेनेजचे चेंबर असेल तर भविष्यात नळातून घाण आणि मैलामिश्रित पाणी येऊ शकते. यातून साथीचे रोग किंवा कॉलरा यांसारखे भयानक रोग पसरण्याची शक्यता येथील नागरिकांनी व्यक्त केली आहे. आधीच कोरोना महामारीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यात साथीचे आजार पसरले तर कोरोनापेक्षा भयंकर परिस्थिती निर्माण होऊ शकते. जवळपास दोन ते अडीच लाख नागरिकांना या पाइपलाइनमधून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होतो. या सर्व नागरिकांना याचा फटका बसू शकतो. गेल्या वर्षभरात 22 नागरिकांचा कोरोना आजारव्यतिरिक्त इतर साथीच्या रोगांनी मृत्यू झाला आहे.
जगात जर चमत्कार कुठे होत असेल, तर सोलापुरात होतोय, अशी आता आमची धारणा झालेली आहे. कारण सोलापुरात स्मार्ट सिटीने जे जे चमत्कार करून दाखविले आहेत, त्याला जगात कुठेच तोड नाही. आज पिण्याच्या पाण्याच्या पाइपलाइनवर ड्रेनेजचे मॅनहोल बांधण्याचा पराक्रम ढेंगळे-पाटलांनी आणि त्यांच्या स्मार्ट सिटीने करून दाखविला आहे.
– महेश धाराशिवकर, अध्यक्ष, शिवसेना सोनार संघटना.

























































