सोलापुरातील तंबाखू, विडी बंडलचे बनावट उत्पादन; सव्वातीन लाखांचा मुद्देमाल जप्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सोलापुरात उत्पादन होणाऱ्य़ा तंबाखू व विडी बंडलचे बनावटीकरण करून विक्री करणाऱ्य़ा गोंदियातील रमेश गुप्ता याला पोलिसांनी अटक केली. त्याच्या ताब्यातून सुमारे सव्वातीन लाख रुपयांचा मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे.

मोहोळ तालुक्यातील कुरूल येथे एका दुकानात गायछाप तंबाखूचे उत्पादन करणारे सोलापुरातील कारखानदार सोमानी यांना आपल्या कंपनीचे बनावटीकरण करून तंबाखू विकत असल्याचे आढळले. याप्रकरणी त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली होती. तपासादरम्यान पोलीस पथकाला गोंदिया येथून बनावटीकरणाचे तंबाखू व विडी बंडल येत असल्याची माहिती मिळाली.

 स्थानिक पोलिसांच्या मदतीने सोलापूर पालिसांनी संशयित रमेश वासुदेव गुप्ता (रा. गड्डा टोळी, जि. गोंदिया) याच्या घरावर छापा घातला. त्याच्याकडे बनावट गायछाप तंबाखूचे पुडे, पाकिटे, लेबल, तसेच साबळे, वाघिरे आणि कंपनी, गौतम गोल्ड, भारत बिडी वर्क्स, देसाई बिडी, देसाई दत्त बिडी, जसवंत छाप टेलिफोन बिडी, बहादूर बिडी, गोपाल गोल्ड बिडी, तंबाखूचे पोते आढळले. पोलिसांनी त्याच्याजवळून सुमारे तीन लाख 35 हजार 72 रुपयांचा बनावट मुद्देमाल जप्त करून अटक केली. सदरची कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील, सहा. पोलीस निरीक्षक रवींद्र मांजरे व त्यांच्या पथकाने केली.