
भाजपचे सोलापूरचे माजी जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांच्या विरोधात पुण्यातील डेक्कन पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी एका महिलेने तक्रार दाखल केली आहे. बेडरूममधील व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर देशमुख यांची भाजपमधून हकालपट्टी करण्यात आली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला पुण्यातील असून, त्यांची काही वर्षांपूर्वी देशमुखसोबत ओळख झाली होती. त्यावेळी पत्नीशी मतभेद झाल्यामुळे तिला लवकरच घटस्फोट देणार असल्याची बतावणी देशमुख यांनी महिलेकडे केली होती. त्यानंतर देशमुख यांनी महिलेवर बलात्कार केल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.
पीडित महिलेला विवाहाचे आमिष दाखकून बलात्कार केला. याची कोणाला माहिती दिल्यास पीडितेसह तिच्या आईला जीके मारण्याची धमकी देशमुख यांनी दिली. डेक्कन पोलीस ठाण्यात दाखल झालेला गुन्हा सोलापुरातील सदर बझार पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे.





























































