
पंढरपूर शहराला जोडणाऱ्य़ा पालखीमार्गांचे काम निकृष्ट झाल्याचे वृत्त नुकतेच प्रसिद्ध झाले होते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी 30 ऑक्टोबरचा दौरा रद्द केला असून, निकृष्ट कामांची चौकशी केल्यानंतर या कामांचे लोकार्पण आणि काही कामांचे भूमिपूजन केले जाणार आहे. दरम्यान, दौरा रद्द केल्याचे कारण देताना भाजप आमदार प्रशांत परिचारक यांनी हा सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
पंढरपूर या तीर्थक्षेत्राला जोडणारे सर्वच मार्ग महामार्गात विस्तारित केले गेले आहेत. या सर्व कामांसाठी 20 हजार कोटींहून अधिक खर्च केला जात आहे. देहू-आळंदी या पालखीमार्गासाठी 10 कोटी रुपये खर्ची पडणार आहेत. कासवगतीने हे काम सुरू आहे. नुकत्याच केलेल्या सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यांना भेगा पडल्या आहेत. याशिवाय निविदांप्रमाणे लाइट, पावसाचे पाणी वितरण, बस थांबे आदींची कामे रखडली असल्याने ग्रामस्थ संतप्त आहेत.
याबाबतचे वृत्त प्रसिद्ध करताच गडकरी यांनी हा विषय गांभीर्याने घेत या कामाच्या चौकशीसाठी विशेष पथक पाठविले आहे. हे पथक कामांची पाहणी करून ग्रामस्थांशी संवाद साधणार आहे. आमदार परिचारकही कामांच्या तक्रारीची माहिती गोळा करीत आहेत. 30 ऑक्टोबरला गडकरी यांचा दौरा असल्यामुळे ठेकेदार युद्धपातळीवर रस्त्यांवरील भेगा सिमेंट व डांबर ओतून झाकण्याचा प्रयत्न करीत आहेत.
या पार्श्वभूमीवर गडकरी यांनी दौरा रद्द केल्याने स्थानिक प्रशासन हादरले असून, या कार्यक्रमाच्या तयारीसाठीचा खर्च वाया गेला आहे. दरम्यान, पुढील महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हा सोहळा होणार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, जिल्हा प्रशासनाने याला दुजोरा दिलेला नाही.


























































