
सोलापुरात सकाळी बाळेजवळ अपघातग्रस्त टेम्पोतील कोंबडय़ा चोरण्यासाठी नागरिकांची झुंबड उडाली होती. मदतीसाठी कोणी पुढे आले नाहीत; पण रिक्षा, दुचाकीवरून कोंबडय़ा पळविण्यात आल्या. या विचित्र घटनेची सोलापुरात दुसऱयांदा चर्चा रंगली आहे. यापूर्वी विजापूर रोडवर मासे वाहतूक करणाऱया गाडीला अपघात झाल्यानंतर अशीच स्थिती झाली होती.
पुण्याहून एक आयशर टेम्पो कोंबडय़ा घेऊन मराठवाडय़ाकडे निघाला होता. शहराजवळील बाळेजवळ सकाळी गाडीचा अपघात झाला. यामुळे गाडीतील काही कोंबडय़ा मेल्या, तर जाळी तुटल्यामुळे काही कोंबडय़ा रस्त्यावर पडल्या. अपघाताची घटना पाहताच आजूबाजूच्या नागरिकांनी अपघातग्रस्त टेम्पोचालकाला मदत करण्याचे सोडून कोंबडय़ा पळविण्यासाठी प्रयत्न करू लागले. ही वार्ता आजूबाजूच्या परिसरात पसरताच काहीजण रिक्षा घेऊन आले. यात कोंबडय़ा कोंबून पसार झाले. काहीजण दुचाकी आणून कोंबडय़ा घेऊन जाऊ लागले. काहीजणांनी टेम्पोवर चढून कोंबडय़ा पळविल्या. येईल त्याने कोंबडय़ा पळविल्याने अवघ्या दोन तासांत टेम्पोतील कोंबडय़ा संपल्या. मृत कोंबडय़ाही काहीजणांनी पिशवीत भरून नेल्याचेही घटनास्थळी दिसून आले. या घटनेनंतर पोलीस घटनास्थळी आले; परंतु तोपर्यंत सर्व कोंबडय़ा चोरून नेण्यात आल्या होत्या.
सोलापुरातील हा दुसरा प्रकार आहे. यापूर्वी विजापूर रोडवरील धर्मवीर संभाजी तलावाजवळ मासे घेऊन निघालेल्या या ट्रकला अपघात झाला असता नागरिकांनी मासे चोरून नेले होते. या घटनेची नोंद रात्री उशिरापर्यंत पोलीस स्टेशनमध्ये झाली नव्हती.




























































