
कर्जबाजारी झाल्यामुळे व देणेकरी घरी येऊ लागल्यामुळे त्यांना कंटाळून आम्ही घर सोडून जात असल्याबाबत डायरीमध्ये लिहून ठेवून एक 33 वर्षीय तरुण आपल्या पत्नी व तीन चिमुरडय़ा मुलांसह निघून गेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी मोहोळ पोलीस ठाण्यात पाचजण बेपत्ता झाल्याची खबर देण्यात आली असून, या घटनेमुळे मोहोळ व पंढरपूर तालुक्यांत खळबळ उडाली आहे.
तात्यासाहेब सुदाम यादव पत्नी कोमल, मुलगी राजनंदिनी, यशराज आणि राजकुमार दोन मुले (रा. पुळुजवाडी, ता. पंढरपूर) अशी निघून गेलेल्यांची नावे आहेत.
सुदाम रामचंद्र यादव हे कुटुंबासमवेत राहत असून, त्यांचा मोठा मुलगा तात्यासाहेब यादव हा किराणा दुकान चालवतो. 14 ऑगस्ट रोजी पहाटे चार वाजता तात्यासाहेब यादव यांनी कारचालक चेतन घाडगे याला फोन करून आम्हाला दवाखान्यात जायचे आहे, मोहोळ येथे सोड, असे सांगितले.
तात्यासाहेब यादव यांनी घरामध्ये मोबाईलचे सिम कार्ड काढून ठेवले होते. ‘मला देणे जास्त झाल्यामुळे तसेच देणेकरी घरी येऊ लागल्यामुळे मी त्यांना कंटाळून घर सोडून पत्नी व तीन मुलांना घेऊन निघून जात आहे’, असे डायरीमध्ये लिहून ठेकले. त्यानंतर कुटुंबीयांनी तीन दिवस नातेकाईकांकडे चौकशी केली. मात्र, ते घरी नाही आल्याने बेपत्ता तात्यासाहेब यादव यांचे वडील सुदाम यादव यांनी मुलगा तात्यासाहेब, सून कोमल, मुलगी राजनंदिनी, यशराज आणि राजकुमार दोन मुले अशी एकूण पाचजण घरातून निघून गेल्याची माहिती मोहोळ पोलीस ठाण्यात दिली आहे.






























































