पत्नीला भेटण्यासाठी पती चक्क बुरखा घालून गेला प्रसूतिगृहात!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सोलापूरच्या शासकीय रुग्णालयातील प्रसूतिगृहात पुरुषांना जाण्यास मज्जाव असतानाही एका तरुणाने बुरखा घालून पत्नीची भेट घेतल्याची घटना उघडकीस आली आहे. मौला असे त्याचे नाव असून, सिव्हिल चौकीत या घटनेची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, डॉक्टरांना पुरुषी आवाजाचा संशय आल्यामुळे त्याचे बिंग फुटले.

सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात मौला याच्या पत्नीला प्रसूतिवेदना सुरू झाल्याने प्रसूतिगृहात दाखल करण्यात आले होते. या परिसरात पुरुषांना जाण्यास मज्जाव आहे. दरम्यान, पत्नीची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती पती मौला याला मिळाली. पत्नीला भेटण्यासाठी मौला याने शक्कल लढवीत बुरखा परिधान केला व प्रसूतिगृहाच्या वॉर्डमध्ये गेला. प्रवेशद्वारावर सुरक्षारक्षकाने हटकल्यावर त्याने फक्त हातानेच पाण्याची बाटली देण्यास चालल्याचे सांगितले. तो थेट प्रसूतिगृहात जाऊन पत्नीजवळ थांबला. यावेळी तेथील डॉक्टरांनी संबंधित पेशंटचे नातेवाईक कोण आहेत? अशी विचारणा केली असता, मौला याने लगेच प्रत्युत्तर देत होकार दिला. यामुळे डॉक्टर व कर्मचाऱयांना पुरुषी आवाजाचा संशय आला. त्यामुळे त्यांनी बुरखा काढण्यास सांगितले. चौकशीत त्याने पत्नीच्या काळजीपोटी आल्याची कबुली दिली.

यावेळी त्याच्या नातेवाईकांनाही मौलाच्या बायकी चालण्याचा व बोलण्याचा संशय आला नाही, त्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. या घटनेनंतर सुरक्षारक्षकांच्या मदतीने त्याला सिव्हिल पोलीस चौकीत आणण्यात आले. या घटनेची नोंद करण्यात आली आहे. पत्नीला भेटण्यासाठी पतीने लढविलेल्या बुरखा घालण्याच्या शक्कलेची चर्चा सिव्हिल परिसरात रंगली होती.