सोलापूर मनपाचे 844 कोटींचे प्रशासकीय अंदाजपत्रक सादर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महापालिकेचे 844 कोटींचे प्रशासकीय अंदाजपत्रक आज आयुक्त पी. शिवशंकर यांनी महापौर श्रीकांचना यन्नम यांच्याकडे सादर केले. आगामी पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सादर केलेल्या अंदाजपत्रकात करवाढ व उत्पन्नवाढीवर भर देण्यात आला आहे.

आयुक्त पी. शिवशंकर यांनी पालिकेचे उत्पन्न आणि केंद्र व राज्य सरकारकडून मिळणारे अनुदान असे एकूण 854 कोटींचे अंदाजपत्रक केले आहे. यामध्ये करवाढ व उत्पन्नवाढीवर भर दिला आहे.

मनपा करापासून 235 कोटी 18 लाख 50 हजार, महसुली उत्पन्न 10 कोटी 27 लाख, भाडे उत्पन्न 24 कोटी 63 लाख 48 हजार, शुल्क आणि वापरकर्ता शुल्क 110 कोटी 49 लाख 45 हजार, विक्री आणि भाडे 1 कोटी 19 लाख 45 हजार, महसूल अनुदान 257 कोटी 88 लाख 35 हजार, गुंतवणुकीतून उत्पन्न 50 लाख, कर्जावरील व्याज 10 लाख पाणीपुरवठा जमा 82 कोटी 81 लाख, भांडवली जमा 21 कोटी 10 लाख, इतर उत्पन्न 70 लाख 10 हजार रुपये असे 744 कोटी 80 लाख 63 हजार रुपये उत्पन्नाच्या बाजूत दर्शविण्यात आले आहेत. यंदाच्या अंदाजपत्रकात गेल्या 15 वर्षांपासून करपद्धतीत सुधारणा न केल्याने येत्या एप्रिलपासून कर आकारणीत सुधारणा करण्यात येणार आहे. याशिवाय पालिकेच्या भाडेदरातही वाढ करण्यात आली आहे.

खर्चाच्या बाजूत वेतन व भत्त्यासाठी 200 कोटी 53 लाख 83 हजार, निवृत्ती वेतन कुटुंबवेतनासाठी 107 कोटी, 36 लाख, 50 हजार, प्रशासकीय खर्च 16 कोटी, 48 लाख, 65 हजार, देखभाल दुरुस्ती 78 कोटी 12 लाख, मक्तेदाराची रक्कम, 7 वा वेतन आयोग सेवकांचे फरक, कर्जावरील व्याज, योजनावरील खर्च, अनुदान, देणगी, पाणीपुरवठा खर्च व भांडवली कामासाठी 87 कोटी 61 लाख 48 हजार असे एकूण 744 कोटी 87 लाख 63 हजार रुपये यांचा समावेश करण्यात आला आहे. यावेळी सभागृह नेते शिवानंद पाटील, विरोधी पक्षनेते अमोल शिंदे, मुख्य लेखापाल शिरीष धनवे यांच्यासह नगरसेवक, पदाधिकारी उपस्थित होते.