सोलापूर जिल्ह्यात नगरपंचायत निवडणुकीत स्थानिक आघाड्यांचे वर्चस्व

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सोलापूर जिल्ह्यातील पाच नगरपंचायत निवडणुकांत स्थानिक आघाडय़ांनीच वर्चस्व ठेवल्याचे दिसून आले. माळशिरस तालुक्यातील माळशिरस, नातेपुते, म्हाळुंगे-श्रीपूर या तीन नगरपंचायतींतील 51 जागांपैकी 38 जागा मोहिते-पाटील समर्थकांच्या स्थानिक आघाडय़ांना मिळाल्या. जिह्यात वैराग राष्ट्रवादी काँग्रेसकडे, तर माढा काँग्रेसने जिंकले आहे.

माळशिरस नगरपंचायतीवर मोहिते-पाटील गटाचे वर्चस्व
माळशिरस नगरपंचायतीत मोहिते-पाटील गटाने निर्विवाद वर्चस्व ठेवले असून यात मोहिते-पाटील गटाचे 10 उमेदवार निवडून आले आहेत. राष्ट्रवादीला दोन, महाविकास आघाडीला दोन, तर तीन जागांवर अपक्ष उमेदवार निवडून आले आहेत.

म्हाळुंग-श्रीपूर नगरपंचायतीवर अपक्षांची आघाडी
माळशिरस तालुक्यातील जिल्हा परिषद गट विसर्जित होऊन त्या ठिकाणी म्हाळुंग-श्रीपूर अशी नव्याने नगरपंचायत निर्माण करण्यात आली आहे. नगरपंचायतीच्या 17पैकी नऊ जागा अपक्षांनी जिंकल्या आहेत, तर राष्ट्रवादी काँग्रेस सहा, काँग्रेस एक, भाजपला एक जागा मिळाली आहे.

वैराग नगरपंचायत निरंजन भूमकर गटाकडे
वैराग नगरपंचायतीच्या अटीतटीच्या निवडणुकीत मतदारांनी राष्ट्रवादीचे निरंजन भूमकर गटाचे 13 उमेदवार निवडून आले आहेत, तर भाजपला अवघ्या चार जागा मिळाल्या आहेत. भाजपचे आमदार राजेंद्र राऊत यांना या निकालाने धक्का मिळाला आहे. 17पैकी 13 जागा भूमकर गटाने जिंकल्याने नगरपंचायत राष्ट्रवादीकडे आली आहे.

माढा नगरपंचायतीत काँग्रेसचे वर्चस्व
माढा नगरपंचायतीत 17 जागांपैकी 12 जागा काँग्रेसचे माजी आमदार धनाजी साठे गटाला मिळाल्या आहेत. शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसला प्रत्येकी दोन, तर एका जागेवर अपक्ष उमेदवार निवडून आला आहे. माढा नगरपंचायतीवर काँग्रेसचे वर्चस्व पुन्हा निर्माण झाले आहे. प्रभाग क्रमांक 1मधून अजिनाथ भगवान राऊत आणि सुनीता अजिनाथ राऊत हे पती-पत्नी निवडून आले आहेत.

नातेपुते नगरपंचायत देशमुख गटाकडे
नातेपुते नगरपंचायतीत 17पैकी 11 जागा मोहिते-पाटील समर्थक बाबाराजे देशमुख गटाने जिंकली असून नागरी विकास आघाडीला पाच जागा मिळाल्या आहेत. एक जागा अपक्षाने जिंकली आहे. बाबाराजे देशमुख यांची जनशक्ती आघाडी व राऊत गटाची नागरी विकास आघाडी यांच्यात थेट लढत झाली होती. अत्यंत चुरशीने झालेल्या या निवडणुकीत बाबाराजे देशमुख गटाने बाजी मारली आहे.