
सोलापूर जिल्ह्याला कोविड लस, ‘रेमडेसिविर’ इंजेक्शन आणि ऑक्सिजनचा पुरवठा इतर जिल्ह्यांपेक्षा सुरळीत होत असून, लसीव्यतिरिक्त कोणताही तुटवडा नाही. लसीकरणाच्या बाबतीत सोलापुरातील शेठ गोविंदजी रावजी आयुर्वेदिक महाविद्यालयाच्या लसीकरण केंद्रात गर्दी टाळण्यासाठी अत्यंत सूक्ष्म नियोजन करण्यात आले आहे. या केंद्राप्रमाणे सोयी-सुविधा, लसीकरणाचे नियोजन करून ‘व्हॅक्सिन ऑन कॉल’ पद्धत जिल्हाभर राबविण्याची सूचना पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केली.
जिल्ह्याला कोविड-19 आढावा बैठकीत पालकमंत्री भरणे बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, मनपा आयुक्त पी. शिवशंकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, पोलीस अधीक्षक तेजस्विनी सातपुते, निवासी उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप ढेले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शीतलकुमार जाधव, छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयाचे डॉ. प्रसाद यांच्यासह ‘आयएमए’चे प्रतिनिधी, खासगी दवाखान्याचे प्रतिनिधी उपस्थित होते.
पालकमंत्री भरणे म्हणाले, आयुर्वेदिक महाविद्यालयातील लसीकरण केंद्र आदर्श आहे. प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि सामाजिक संघटना एकत्र आल्यानंतर काय घडू शकते, याचे हे उत्तम उदाहरण आहे. लसीकरण कक्ष, डाटा एण्ट्री, नोंदणी विभाग, पाणी, रुग्णांना बसण्याची व्यवस्था आणि येणाऱया रुग्णांसाठी सुरक्षित अंतर यांचे काटेकोर पालन या ठिकाणी होत आहे. नागरिकांना पहिला आणि दुसरा डोस नियोजनानुसार दिला जातोय. ज्यांचा दुसरा डोस असेल, त्यांना फोनद्वारे बोलावून घेतले जात आहे. यामुळे गर्दी टळली आहे. या प्रकारे जिल्हाभर नियोजन करा. दररोजच्या लसीकरणाची क्षमता वाढवा. तिसऱया लाटेची शक्यता धरून ऑक्सिजन, बेड्सची उपलब्धता, कोविड केअर सेंटर्सची व्यवस्था करा. खासगी दवाखान्यांत बेड्स शिल्लक असताना डॅशबोर्डवर दाखवीत नाहीत. टीमद्वारे तपासणी करून अशा दवाखान्यांवर कारवाई करा. ऑक्सिजनच्या बाबतीत 58 मेट्रिक टन पुरवठा होत आहे. कमतरता वाटली तर आणखी मागणी करावी. खासगी दवाखान्यांनी मागणी केल्यास त्वरित ऑक्सिजन प्लाण्टला मान्यता द्यावी, असेही पालकमंत्री भरणे यांनी सांगितले.
जिह्यातील लॉकडाऊन (कडक निर्बंध) उद्या (दि. 15) संपत असला, तरी पुढचे 15 दिवस शासकीय लॉकडाऊन आहे. या काळात रुग्णांची साखळी तोडण्यासाठी पोलीस यंत्रणेने कडक पालन करावे. ग्रामीण भागातील भाजीविक्रेते एकाच ठिकाणी येणार नाहीत, याची दक्षता घेऊन उपाययोजना करा. जनतेच्या महत्त्वाच्या अडचणी होणार नाहीत, याकडेही लक्ष द्या. पावसाळ्यापूर्वीची कामे प्राधान्याने पूर्ण करण्याची सूचनाही भरणे यांनी दिली.
किराणा दुकाने, मंडई आज सुरू होणार
n सोलापूर जिह्यात यापूर्वी लागू झालेला लॉकडाऊन 15 मेपासून पुढेही लागू राहील; परंतु या दरम्यान जिह्यातील किराणा दुकाने, भाजीमंडई तसेच इतर अत्यावश्यक सेवा सुरू राहतील. अत्यावश्यक सेवेच्या ठिकाणी लोकांनी अनावश्यक गर्दी करू नये. लोकांनी फिजिकल डिस्टन्सिंग पाळावेत, अन्यथा पोलीस विभागाला कारवाईचे आदेश दिले आहेत. याठिकाणी गर्दी आढळल्यास 100 टक्के कारवाई होईल, अशी माहिती पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.


































































