
गेल्या दोन वर्षांत कोरोनामुळे गेल्या दोन-तीन वर्षांपासून ठप्प झालेल्या दुरुस्तीच्या कामांना आता प्राधान्य देण्याची गरज आहे. मात्र, अधिकाऱ्यांमधील धुसफूस व समन्वयाचा अभाव असल्याने सोलापूर शहर व जिल्ह्यातील विविध शासकीय इमारतींच्या दुरुस्तीची कामे रखडली आहेत. या इमारती मोडकळीस आल्या असून, अशीच अवस्था शहर व जिल्ह्यातील रस्त्यांबाबत आहे. रस्त्यांवरील वाढत्या खड्डय़ांमुळे नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे.
सोलापूर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी वारंवार दुरुस्तीची मागणी करूनही अधिकाऱ्यांमधील मतभेदामुळे ही कामे रखडल्याची बाब पुढे येत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संजय माळी यांनी काहीबाबतीत शंका उपस्थित करीत दुरुस्तीच्या कामांना स्थगिती दिली आहे. त्यामुळे कार्यकारी अभियंता स्तरावरील अनेक कामे खोळंबून पडली आहेत.
सोलापूर शहरात बांधकाम विभागाकडे विविध कार्यालये आणि शासकीय निवासस्थानांच्या दुरुस्त्यांची कामे करण्यासाठी लोकप्रतिनिधी तसेच त्या-त्या यंत्रणेकडून पाठपुरावा केला जात आहे. आतापर्यंत कोरोनामुळे अशा कामांना दुय्यम स्थान देण्यात आले होते. आता मात्र ही दुरुस्तीची कामे हाती घेणे आवश्यक असताना प्रलंबित पडत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय व कर्मचारी निवासस्थाने, पोलीस कर्मचाऱ्यांची निवासस्थाने, पोलीस ठाणे, कुमठा नाका येथील सर्व कर्मचारी, अधिकारी निवासस्थाने, मेडिकल कॉलेज आणि वसतिगृहे, शासकीय तंत्रनिकेतन, मुलींचे वसतिगृह, औद्योगिक प्रशिक्षण संस्था मुलांचे आणि मुलींचे वसतिगृह यांसह विविध कार्यालये आणि निवासस्थानांची दुरुस्ती गेल्या 8 महिन्यांपासून ठप्प आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागातील अनेक कामे मोजक्याच आणि मर्जीतील लोकांनाच देण्याचा प्रकार वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सुरू आहे. त्यामुळे ठेकेदार आणि अधिकाऱ्यांचे सूत जुळले आहे. इतर लोकांना या प्रक्रियेपासून दूर ठेवले जात असल्याने काही मोजक्याच आणि बडय़ा राजकीय नेत्यांशी संबंधित असलेल्या ठेकेदारांचीच मोनोपॉली सार्वजनिक बांधकाम विभागात सुरू झाल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.
ठेकेदारांमध्ये लावली जातात भांडणे
सार्वजनिक बांधकाम विभागाकडे उपअभियंता असलेले अधिकारी गेल्या पाच वर्षांपासून एकाच ठिकाणी ठाण मांडून बसले आहेत. त्यामुळे त्यांची बदली का होत नाही? असा सवाल अनेक ठेकेदारांनी उपस्थित केला आहे. तसेच, अनेक अधिकाऱ्यांकडून ठेकेदारांमध्ये भांडणे लावण्याचा प्रकार सुरू असल्याची चर्चा रंगली आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागात सुरू असलेल्या सावळ्या गोंधळाकडे आता वरिष्ठ पातळीवरून लक्ष द्यावे, अशी मागणी केली जात आहे.
नाहक बदनाम करण्याचा प्रकार – संजय माळी
गेल्या दोन-तीन वर्षांत कोरोनामुळे आवश्यक तेवढा निधी विभागाला प्राप्त झाला नाही. त्यामुळे अनेक नवी कामे हाती घेता आली नाहीत. तसेच, विभागाकडून आलेल्या प्रस्तावांना आणि तातडीच्या कामाला तत्काळ मंजुरी दिली जाते. त्यामुळे काही लोकांना कामे मिळाली नसतील, त्यामुळे विभागाला बदनाम करण्याचा प्रकार सुरू आहे, असे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संजय माळी यांनी सांगितले.
























































