कोरोना निगेटिव्ह असाल तरच सोलापूरात प्रवेश, शाळा महाविद्यालये 7 मार्चपर्यंत बंद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे प्रशासनाकडून पुन्हा काही निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यानुसार परराज्यांतून सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करायचा असेल, तर कोरोना निगेटिव्ह चाचणीचे प्रमाणपत्र सक्तीचे करण्यात आले आहे.

यासह शहरासह जिल्ह्यात रात्री दहा ते सकाळी पाच वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. दरम्यान, इयत्ता दहावी आणि बारावीचे वर्ग सोडून सर्व शाळा-महाविद्यालये 7 मार्चपर्यंत बंद राहणार असल्याची माहिती पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे.

कोरोना प्रादुर्भावाच्या अनुषंगाने जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, अधिकाऱ्य़ांची बुधवारी नियोजन भवन येथे पालकमंत्री भरणे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे, महापौर श्रीकांचना यन्नम, आमदार बबनराव शिंदे, आमदार सुभाष देशमुख, आमदार राजेंद्र राऊत, आमदार प्रणीती शिंदे, पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, महापालिका आयुक्त पी. शिवशंकर, अतिरिक्त जिल्हाधिकारी संजीव जाधव, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अर्जुन गुंडे, निवासी उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अतुल झेंडे आदी उपस्थित होते.

पालकमंत्री भरणे म्हणाले, सोलापूरकरांनी कोरोना लढय़ात साथ दिल्याने कोरोनाचे संकट परतवून लावण्यास मदत झाली. पुन्हा कोरोनाचा नवा स्ट्रेन आलेला आहे. सोलापूर जिल्ह्यात रुग्ण वाढू लागले आहेत. आपल्याला पुन्हा लॉकडाऊन परवडणारा नाही. मात्र, नागरिकांनी शासकीय आणि आरोग्य नियमांचे काटेकोर पालन करणे हिताचे आहे.

सोलापुरात वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर एसटी बस, रेल्वे व अन्य वाहनांतून येणाऱ्य़ा नागरिकांना कोरोना रिपोर्ट सक्तीचे करण्यात आले आहे. जिल्ह्याच्या सीमेवर गाडय़ा तपासूनच सोडण्यात येणार आहेत.

सध्या महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणाऱ्य़ा सर्वच गाडय़ांची तपासणी जिल्ह्याच्या सीमेवर होणार आहे. त्याच धर्तीवर कर्नाटकसह अन्य राज्यांतून येणाऱ्य़ा प्रवासी व नागरिकांना कोरोना निगेटिव्ह रिपोर्ट सक्तीचे करण्यात आले आहे. 7 मार्चपर्यंत जिल्ह्यात रात्री 11 वाजल्यापासून पहाटे 5 वाजेपर्यंत संचारबंदी करण्याच्या सूचना पालकमंत्री भरणे यांनी दिल्या.

कर्नाटक सीमावर्ती भागात नाकाबंदी

कोरोनोच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक सरकारने महाराष्ट्रातून येणाऱ्य़ा प्रवाशांची सीमावर्ती सिन्नूर भागात नाकाबंदी केली आहे. महाराष्ट्रातून येणाऱ्य़ा प्रवाशांची 72 तासांच्या आतील कोरोना चाचणीच्या प्रमाणपत्राची मागणी केली जात आहे. यामुळे कर्नाटक, गुलबर्गा, आळद, अफझलपूर, गाणगापूरकडे जाणाऱ्य़ा एसटीचा प्रवास थांबला आहे.

ठिकाणी मास्क न वापरणाऱ्य़ांना एक हजार रुपये दंड

गर्दीची ठिकाणे, भाजीमंडई या ठिकाणी पोलिसांनी लक्ष द्याके. जिल्हाधिकारी आणि मनपा आयुक्तांनी नियोजन करून मंडईसाठी वेगळी यंत्रणा करण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या. गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरणे गरजेचे आहे. जे वापरणार नाहीत, त्यांना एक हजार रुपयांचा दंड आणि इतर ठिकाणी 500 रुपयांचा दंड आकारण्याचा निर्णयही घेण्यात आल्याचे भरणे यांनी सांगितले.

‘ट्रेसिंग, टेस्टिंग आणि ट्रिटमेंट’वर भर द्या

कोरोनाचा संभाव्य प्रसार रोखण्यासाठी ‘आरटीपीसीआर’ चाचण्या वाढवा. ‘ट्रेसिंग, टेस्टिंग आणि ट्रिटमेंट’ या त्रिसूत्रीवर भर देऊन प्रभावीपणे राबवा. जे संसर्ग पसरविणारे आहेत, त्यांच्याही चाचण्या करा. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात कोविड केअर सेंटर, डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर, डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलची तयारी करा. कोरोनाचे लसीकरण पहिल्या टप्प्यात 58 टक्के, तर दुसऱ्य़ा टप्प्यात 40 टक्के झाले आहे. लसीकरणाची टक्केकारी वाढविण्याच्या सूचनाही भरणे यांनी केल्या.