
सोलापूर जिह्याची वरदायिनी असलेल्या उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू झालेल्या परतीच्या पावसामुळे उजनी धरण 109 टक्क्यांवरून 111 टक्के भरले आहे. त्यामुळे सोमवारी सकाळपासून उजनीतून भीमा नदीपात्रात वीस हजार क्युसेक्सने विसर्ग करण्यात येत होता. दुपारी हा विसर्ग 5 हजारपर्यंत कमी करण्यात आला. मात्र, दुपारनंतर त्यात वाढ करून तो दहा हजार क्युसेक्स करण्यात आला आहे. दरम्यान, भीमा नदीची पातळी वाढल्याने नदीकाठी सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
उजनी धरण 111 टक्के भरले आहे. गेल्या दोन दिवसांत उजनीच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू आहे. त्यामुळे उजनीत बंडगार्डन व दौंड येथून येणाऱया निसर्गात वाढ होण्याची शक्यता निर्माण झाल्याने उजनीतून भीमा नदीला पाणी सोडण्यात आले आहे. सोमवारी सकाळी सहा वाजता उजनीतून विसर्ग सोडण्यात आला होता. त्यामध्ये दुपारी घट करण्यात आली. मात्र, पावसाचा जोर वाढल्याने विसर्ग पुन्हा दहा हजार क्युसेक करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर कालवा, बोगदा, उपसा
सिंचन योजना, वीज निर्मितीसाठीही पाणी सोडण्यात येत आहे. दरम्यान, सोमवारी उजनी धरण व्यवस्थापनाने भीमा नदीच्या काठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. नदीपात्रातील बंधाऱयांवरील वाहतूक बंद करून नदीकाठच्या गावातील लोकांना नदीपात्राकडे जाण्यास मनाई करण्यात आली आहे.
भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
उजनी धरणातील पाणीपातळी
- एकूण पाणीपातळी 497.330 मीटर
- एकूण पाणीसाठा 3491.21 दलघमी
- एकूण पाणीसाठा 123.27 टीएमसी
- उपयुक्त साठा 1688.40 दलघमी
- उपयुक्त साठा 59.61 टीएमसी
- टक्केवारी 111.28 टक्के
- आवक
- दौंड विसर्ग 4623 क्युसेक
- बंडगार्डन 4359 क्युसेक
- विसर्ग
- कालवा 1000 क्युसेक
- बोगदा 200 क्युसेक
- सिना-माढा सिंचन 259 क्युसेक
- दहीगाव सिंचन 105 क्युसेक
- वीज निर्मिती 1,600 क्युसेक
- नदी विसर्ग 10,000 क्युसेक

























































