
मुंबई विमानतळावर विविध गरजांसाठी लागणाऱ्या विजेसाठी केवळ पारंपरिक वीजनिर्मितीवर अवलंबून न राहता सौर आणि पवन ऊर्जेची सांगड घालून हायब्रिड वीजनिर्मितीचा प्रयोग करण्यात आला आहे. अशा प्रकारची हायब्रिड वीजनिर्मिती करणारे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ हे देशातील पहिले विमानतळ ठरले आहे. विंडस्ट्रिम एनर्जी टेक्नोलॉजीजच्या सहकार्याने प्रायोगिक तत्त्वावर हा प्रयोग सुरू आहे.
छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाने अगदी सुरुवातीपासूनच कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण कमी करण्याच्या दिशेने वाटचाल सुरू ठेवली आहे. गेल्या काही वर्षांमध्ये विमानतळावर पर्यावरणाची हानी होईल, अशा कमीत-कमी गोष्टी असतील यांची काळजी घेतली आहे. पर्यावरणस्नेही इमारत रचना, विजेवर चालणाऱ्या गाड्या असे विविध उपक्रम राबवले आहेत. आता या दृष्टीने आणखी एक पाऊल पुढे टाकत हरित ऊर्जेच्या वापराची क्षमता वाढवण्यासाठी विमानतळावर 10 केडब्ल्यूपी हायब्रिड सोलार मिल तैनात केली आहे. यात 2 केडब्ल्यूपी टर्बोमिल (पवन ऊर्जा) आणि 8 केडब्ल्यूपी सोलार पीव्ही मॉड्युल्सचा (सौर ऊर्जा) समावेश आहे, ज्यातून दिवसाला कमीतकमी 36 केडब्ल्यूएच वीजनिर्मिती होईल, असा अंदाज आहे. जगभरात कार्बन उत्सर्जन वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर, मुंबई विमानतळाने हे महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे.
- हायब्रिड तंत्रज्ञान म्हणजे स्वच्छ, हरित, पर्यावरणस्नेही आणि ध्वनिरहित उपाययोजना कार्यान्वित करण्याच्या दिशेने उचललेले एक महत्त्वाचे पाऊल आहे.
- हवाई वाहतूक क्षेत्रासाठी कमाल कार्यक्षमता आणि किमान कार्बन उत्सर्जनाचे लक्ष्य साध्य करण्यास विमानतळाला सक्षम बनवेल.
- या शाश्वत उपक्रमामुळे पारंपरिक विद्युत स्रोतांवरील अवलंब कमी होणार असून विमानतळाने ‘नेट झिरो’ एमिशनच्या दिशेने पाऊल टाकले आहे.

























































