
>>डॉ. अंजुषा पाटील
मराठी वाङ्मय प्रकारात ‘कथा’ हा साहित्यप्रकार खूपच लोकप्रिय आहे. आयुष्याच्या वळणावर भेटणारी माणसं या कथेच्या माध्यमातून वाचकांना भेटतात. ती वाचकांना आपली वाटतात.
मधु मंगेश कर्णिक यांचा ‘उत्तरायण’ हा कथासंग्रह मराठी ग्रंथसंग्रहालयामध्ये माझं लक्ष वेधून घेत होता. कथासंग्रहाच्या नावावरून मी वेगवेगळे अंदाज बांधले होते. कथासंग्रहाचं शीर्षक व ‘उत्तरायण’ ही पहिलीच कथा याबाबत मत असं बनलं होतं की, ही पहिली कथा शेवटी का नाही ठेवली बरं?
जसजशा कथा वाचत गेले तसतसा मनातील प्रश्नांचा अर्थ उमगत गेला. या कथासंग्रहात प्रस्तावना, निवेदन असं काहीही नसून फक्त लेखकाचं मनोगत आहे. जीवनातील नातीगोती उलगडणाऱया या कथा सकारात्मक शेवट करतात. साठोत्तरीच्या या कथा आजच्या घडीला तंतोतंत लागू पडतात. आधुनिक अभिनव विचार असून पहिल्या तीन कथा राजकारणावर आधारित आहेत. बऱयाच कथा लेखकांच्या अनुभव समृद्धीच्या प्रतीक आहेत. तसेच अध्यात्मावर आधारित स्वप्नांच्या दुनियेत प्लॅंचेट करत, नातीगोती सांभाळत हा कथासंग्रह वेगाने वाटचाल करतो. कथेतील पात्रं एकमेकांशी जोडलेले आहेत.
सामान्यांपासून मुख्यमंत्र्यांपर्यंत ओळख असूनही लेखक कुठेही स्वतःचा फायदा करून घेत नाही.
आयुष्याच्या उत्तरार्धात माणसाचा स्वभाव मवाळ बनतो. प्राप्त परिस्थितीत तडजोड करून आयुष्य सुखी करण्याकडे कल असतो. त्याचं वास्तव चित्रण या कथासंग्रहात दिसून येते. या सर्व सत्यकथा आहेत असं वाटते. नायक-नायिका या वास्तवतेचं दर्शन घडवतात. वाचताना वाचकाची उत्सुकता चाळवते. एकेक कथा वेगवेगळ्या विश्वात वाचकाला घेऊन जाते आणि खिळवून ठेवते.
उत्तरायण, अस्तांचल आणि उदयाचल या पहिल्या तीन कथा राजकारणावर आधारित आहेत. रुद्राक्ष व अद्वैत या कथा आध्यात्मिक बैठकीवर आधारित आहेत.
महापापराशी तरले कीर्तनी, प्रत्यक्ष पुराणी, वंद्य झाले ।
एकनाथ महाराजांच्या या उक्तीचा उपयोग करून कीर्तनाचा पूर्वरंग संपल्याचे ‘अद्वैत’ या कथेतून लक्षात येते. कुटुंबवत्सल, प्रापंचिक समस्या, विदेशातून आलेल्या व्यक्तींचं व्यक्तिचित्रण असे स्वभावाचे पैलू विरुद्ध दिशेने जाताना दिसतात.
आजच्या समाजात आदर्श प्रस्थापित करण्यासाठी या कथा नक्कीच प्रेरणादायी आहेत. लेखकांनी तत्त्वांशी कुठेही मुरड घातलेली नाही. विवेक आणि वैराग्य, प्रेम आणि वासना यांचा सुरेख मेळ घालण्यात लेखक यशस्वी झाले आहेत.
कलाकाराची कला आणि माणसाच्या कल्याणासाठी केलेला कायदा पारितोषिकाचं स्वरूपच बदलतो. गुणवत्तेबरोबर ओळख असली की, आपली कामं बरोबर होतात असा आशय ‘ओळख’ या कथेतून खूप काही सांगून जातो. कैवल्याच्या चांदण्यात श्रीकृष्णाची प्रतिमा अजूनच सुंदर दिसते. मृगया करत मायेचा पाझर व प्रेमाचा सुंदर अशा जंगलाचं नवीन कायद्याचं स्वरूप वाचायला मिळते.
आयुष्याच्या उत्तरार्धात अनेक तडजोडी स्वीकारण्याची मानसिकता माणसाच्या ठायी निर्माण होते. त्या लवचीकपणामुळे जीवनाच्या उत्तरार्धातील सोनेरी संधीकाल हा सुखाचा उत्तरायण बनतो.
उत्तरायण
लेखक – मधु मंगेश कर्णिक
प्रकाशक – यशोदा प्रकाशन
पृष्ठ – 135, मूल्य – रुपये 130/-



























































