पांढऱ्या केसांनी चिंताग्रस्त आहात? मग करा हे घरगुती उपाय…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एक काळ असा होता की पांढरे केस म्हणजे वाढत्या वयाचं एक लक्षण होतं. मात्र अलिकडे अगदी लहान मुलांपासून तरुणांचे केस देखील वेळेआधीच पांढरे होवू लागले आहेत. ही समस्या आता सामान्य बनू लागली आहे. काही वेळेस ही समस्या अनुवांशिक असते. अलिकडे बदललेली जीवनशैली , पोषक तत्व नसलेला आहार आणि प्रदूषण देखील यासाठी कारणीभूत आहेत. तसचं केमिकल असलेल्या हेअर प्रोडक्टमुळे देखील अकाली केस पांढरे होण्याची समस्या वाढू लागली आहे. पांढरे झालेले केस काळे करण्यासाठी अनेकजण हेअर कलर किंवा हेअर डायचा वापर करतात. मात्र यामुळे फक्त काही दिवसांपुरते केस काळे होतात. शिवाय या डाय आणि कलरमध्ये भरपूर प्रमाणात केमिकल्स असल्याने केस कोरडे आणि निस्तेज दिसू लागतात. यासाठीच घरगुती उपायांच्या मदतीने केस काळे करणं हा उत्तम पर्याय आहे.

काही नैसर्गिक पदार्थांच्या आणि वस्तूंच्या मदतीने अकाली पांढरे झालेले केस काळे करणं शक्य आहे. यामुळे केसांवर दुष्परिणाम देखील होणार नाही. केस काळे करण्यासाठी तुम्हाला लागणारा महत्वाचा बेस घटक आहे तो म्हणजे नारळाचं तेल. घाण्याचे नारळ तेल वापरणं हा अधिक चांगला पर्याय आहे. कारण हे तेल पूर्णपणे नैसर्गिक असतं.

नारळ तेल आणि मेंदी- मेदी अगदी नैसर्गिकरित्या तुमचे पांढरे केस रंगवण्यासाठी उपयोगी पडेल. यासाठी मेंदीचा योग्य प्रकारे वापर करणं गरजेचं आहे. हे तेल बनवण्यासाठी काही मेंदीची पानं उन्हात वाळवून घ्या. त्यानंतर नारळाच्या तेलात ही पानं टाकून तेल चांगलं तापवत ठेवा. पानांचा रंग तेलात पूर्णपणे उतरल्यानंतर गॅस बंद करा आणि तेल गार होवू द्या. त्यानंतर हे तेल केसांना चांगल्या प्रकारे लावा आणि २-३ तासांसाठी राहू द्या. त्यानंतर केस स्वच्छ पाण्याने धुवा आणि वाळू द्या. या तेलाचा रिझल्ट तुम्हाला लगेचच दिसेल.

नारळाचे तेल आणि आवळा- आवळा त्वचेसोबतच केसांसाठी देखील फायदेशीर आहे. यामध्ये विटामिन सी आणि आयरन मुबलक प्रमाणात उपलब्ध असतं. आवळ्याचं तेल तयार करण्यासाठी तुम्ही आवळा पावडरचा वापर करू शकता. नारळाच्या तेलात आवळा पावडर मिसळून पेस्ट तयार करून घ्या. ही पेस्ट केसांना लावा. हा हेअरमास्क केसांना साधारण अर्धा तास राहू द्या. त्यानंतर केस स्वछ पाण्याने धुवा. यामुळे पांढरे केस काळे होण्यास मदत होईल. तसचं केसांना पुरेसं पोषणंही मिळेल.

नारळाचे तेल आणि कडीपत्ता- अकाली पांढरे होणाऱ्या केसांसाठी कडीपत्ता हा एक चांगला उपाय आहे. यासाठी १२-१५ कडीपत्त्याची पानं स्वच्छ धुवून वाळवून घ्यावी. त्यानंतर दोन चमचे नारळाचं तेल तापत ठेवा. यात कडीपत्त्याची पानं टाकून एक उकळी घ्या. त्यानंतर गॅस बंद करून तेल गार होवू द्या. कडीपत्त्याच्या या तेलाने केसांना चांगलं मसाज करा. दोन तास तेल केसांना राहू द्या. त्यानंतर एखाद्या हर्बल शॅम्पूने केस धुवा. आठवड्यातून दोन वेळा या तेलाने मसाज केल्यास परिणाम दिसून येईल.

नारळ तेल आणि तुरटी- पांढरे केस काळे करण्यासाठी तुरटी आणि नारळाचं तेल उपयुक्त ठरू शकतं. यासाठी नारळाच्या तेलामध्ये तुरटीची पावडर मिस्क करावी. या तेलाने केसांना मसाज करून काही वेळ तेल राहू द्यावं. त्यानंतर केस स्वच्छ धुवावे. यामुळे केसांमध्ये कोलेजन बूस्ट करण्यासाठी आणि केस काळे करण्यासाठी मदत होईल. नारळाच्या तेलामुळे केसाचा रंग टिकून राहण्यास मदत होते. या तेलाचा वापर केल्याने कोंडा दूर होण्यासही मदत होते.

या नैसर्गिक उपांसोबतच केस पांढरे होणं टाळण्यासाठी कमीत कमी केमिकल्स असलेल्या प्रोडक्टची निवड करणं गरजेचं आहे. शक्य तेव्हा नैसर्गिक हेअर मास्क किंवा तेलांचा आणि हेअर वॉशचा वापर करावा. त्याचप्रमाणे पोषक आहार देखील तितकाच गरजेचा आहे.