कोणी गोळीबार करतंय, कोणी हातपाय तोडण्याची भाषा करतंय… अजित पवार यांचा हल्लाबोल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गेल्या तीन महिन्यात राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचे तीनतेरा वाजले आहेत. सत्ताधारी पक्षाचे कुणी गोळीबार करतंय, कोणी हातपाय तोडण्याची भाषा करतंय… अरे काय चाललंय काय, तुझ्या बापाच्या घरंच आहे काय, असा हल्लाबोल विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला.

बीड जिह्यातील माजलगाव येथे आज मराठवाडा मुक्तिसंग्रामदिनानिमित्ताने विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी राज्यातील सरकारच्या कारभारावर सडकून टीका केली. अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतकऱयांना पीक विम्याचे पैसे मिळत नाहीत. याबद्दल मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री चकार शब्द बोलत नाहीत. सत्तेची नशा, धुंदी आणि मस्ती उतरविण्याची ताकद महाराष्ट्राच्या मतदारांमध्ये आहे, हे शिंदे-फडणवीस सरकारने लक्षात घ्यावे, असे खडे बोलही अजित पवार यांन सुनावले. या पत्रकार परिषदेस माजी किरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, आमदार प्रकाश सोळंके यांची उपस्थिती होती.

 केवळ झेंडावंदन करून जाणे दुर्दैवी

स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव जसा साजरा करण्यात आला, तसाच मराठवाडा मुक्तिसंग्रामदिनाचा कार्यक्रमही मोठय़ा प्रमाणावर साजरा करता आला असता. मात्र, मुख्यमंत्र्यांना हैदराबादचा कार्यक्रम मोठा वाटला. निजामाविरोधात लढणाऱयांना अभिवादन करणे, त्यांचे स्मरण करणे गरजेचे होते. परंतु, मुख्यमंत्री केवळ झेंडावंदन करून हैदराबादला निघून गेले, हे अतिशय दुर्दैवी असल्याचा टोला अजित पवार यांनी लगावला.

सरकारच्या नाकर्तेपणामुळे प्रकल्प गेला

वेदांता फॉक्सकॉनचा प्रकल्प केवळ सरकारच्या नाकर्तेपणामुळे गुजरातेत गेला. यासंदर्भात प्रकाश आंबेडकर यांनी केलेली टीका अनाठायी असून त्यांनी माहिती घेऊन बोलावे, असे अजित पवार म्हणाले. या प्रकल्पासाठी महाविकास आघाडी सरकारने भरपूर प्रयत्न केले. तरीही हा प्रकल्प गुजरातेत कसा गेला? सध्याचे सरकारच प्रकल्प महाराष्ट्रात ठेवण्यात कमी पडले, असा आरोप अजित पवार यांनी केला.