
सामना प्रतिनिधी । चाकूर
रविवारी रात्री शहरातील गजबजलेल्या बोथी चौकात एकाचा धारदार शस्त्राने गळ्यावर सपासप वार करून खून केला. आरोपीच्या शोधासाठी पोलिसांनी चार पथक नेमले होते. मात्र आरोपी स्वत:हून देवणी पोलीस स्टेशन येथे हजर झाला आणि खुनाची कबुली दिली. दरम्यान, आरोपी हा मयताचा जावईच निघाला आहे. चाकूर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असल्याचे पोलीस निरीक्षक रामेश्वर तट यांनी सांगितले.
मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील राचन्नावाडी येथील व्यंकट भिमराव नंदगावे (४५) यांना तीन मुली व एक मुलगा असून गावातच एका शेतकऱ्यांकडे सालगडी म्हणून काम करतात. एक मुलगी विवाहित असून दुसऱ्या मुलीला स्थळ पाहण्यासाठी लातूर तालुक्यातील बामणी येथे ते गेले होते. रविवारी रात्री परत चाकूर गावाकडे जाण्यासाठी बोथी चौकात वाहनाची वाट पाहत थांबले असता त्यांचा अज्ञात व्यक्तीने धारदार शस्त्राने गळ्यावर, हातावर सपासप वार करून खून केल्याची घटना रविवारी रात्री ९.३०च्या सुमारास घडली. पोलीस निरीक्षक रामेश्वर तट, पोलीस उपनिरीक्षक संतोष गिते, शैलेश बंकवाड खुन्याच्या मागोव्यावर होते.
दरम्यान, सोमवारी मयताचा भाऊ विजयकुमार नंदगावे यांनी या प्रकरणी पोलिसात फिर्याद देऊन मृताच्या जावयानेच खून केल्याचा उल्लेख केला होता. त्या दिशेने पोनि.तट यांनी तपासासाठी पोलीस उपनिरीक्षक शैलेश बंकवाड, अभंग माने,जगनाथ भंडे ,सुभाष हारणे यांच्यासह चार पथकांची नेमणूक करीत आरोपीच्या शोधासाठी रवाना करण्यात आले होते. आरोपीला अटक केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा नातेवाईकांनी घेतला होता. परंतु आरोपी स्वत:हूनचा पोलिसात हजर झाल्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला.
मयत व्यंकट यांची पहिली मुलगी जनाबाई हिचा विवाह देवणी तालुक्यातील पंढरपूर येथील पुंडलीक गोविंद काळे (२५) यांच्यासोबत झाला होता. परंतु जावई मुलीला नेहमी दारू पिऊन त्रास देत असल्याने मागील वर्षी त्यांच्यात समेट होऊन मुलीची फारकत झाली होती. त्यानंतर काळे यांनी बायकोला पळवून नेऊन एक वर्षे नांदवली अशातच त्यांना एक मुलगाही झाला होता. परंतु सासरा व्यंकट यांच्याविषयी मनात राग असल्याने जावाई पुंडलीक काळे यांने रविवारी रात्रा सासऱ्याचा काटा काढला आणि तो स्वतःहून देवणी पोलीस स्टेशनला हजर झाला.






























































