
कोरोना रुग्णांना मित्र किंवा नातेवाईक भेटायला जाऊ शकत नाही. पण त्यांना या काळात ‘पुस्तक मित्र’ आधार देताहेत. लेखिका, अभिनेत्री सोनल सचिन गोडबोले पुण्यात ‘बुक क्लब’ हा उपक्रम चालवतात. या उपक्रमा अंतर्गत येरवडा येथील कोविड सेंटरमध्ये नुकतेच मोफत वाचनालय सुरू करण्यात आले. सुमारे 250 पुस्तके या सेंटरमध्ये दान करण्यात आली. याआधी बुक क्लबच्या वतीने भोसरी कोविड सेंटर येथेही पुस्तके उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. याबद्दल पुस्तक मित्र आणि बुक क्लबवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
पुणे येथील सोनल गोडबोले यांनी फेसबुकवर ‘पुस्तक मित्र’ हा ग्रुप सुरू केला आहे. लोकांना वाचनाची सवय लागावी, त्यांनी आपण वाचलेले शेयर करावे, व्यसनांमध्ये वेळ आणि पैसा घालवण्याऐवजी योग्य ज्ञान मिळवण्यात खर्च करावा यासाठी ‘पुस्तक मित्र’ची स्थापना करण्यात आली आहे. पुण्यातील पुस्तक मित्रांनी एकत्र येऊन दीड वर्षापूर्वी बुक क्लब हा उपक्रम सुरू केला आहे. याअंतर्गत पुण्यात राहणारे लोक एकमेकांना भेटतात. वाचलेल्या पुस्तकांवर चर्चा करतात. पुस्तकांची देवाणघेवाण करतात. तसेच वाचन संस्पृती वाढवण्यासाठी विविध कार्यक्रम हाती घेतात. बुक क्लबने दोन कोविड सेंटरना पुस्तके भेट दिली आहेत, अशी माहिती सोनल गोडबोले यांनी दिली.
– सोनल गोडबोले या लेखिका आहेत. लॉकडाऊनमध्ये पुण्यात आल्यावर त्यांनी ‘बियाँड सेक्स’ ही कादंबरी लिहिली. त्याआधी त्या लंडनमध्ये राहत होत्या. वर्षभरात या कादंबरीच्या तीन आवृत्त्या प्रकाशित झाल्या आहेत. तसेच अन्य भाषांमध्ये ही कांदबरी येणार आहे. ‘13 हजार किमी’ हे त्यांचे आणखी एक पुस्तक आलेले आहे. याशिवाय ‘पुरुष हृदय’ नावाचे तिसरे पुस्तक लवकरच येणार आहे. ‘मेकिंग ऑफ बियाँड सेक्स’ हा पुस्तकरूपी वेगळा प्रयोगही त्या करत आहेत. सोनल गोडबोले यांनी ‘नटसम्राट’ या नाटकाचे सलग 8 प्रयोग 31 तास 45 मिनिटं पुण्यातील बालगंधर्व मंदिरात सादर करून विश्वविक्रम केलाय.
जुनी पुस्तके दान करा
बुक क्लब हा उपक्रम पुण्यातील मंडळी राबवत असली तरी पुण्याबाहेर त्यांचे काम सुरू आहे. खेडोपाडी जिथे वाचनालयांची गरज आहे, तिथे पुस्तके दान केली जातात. म्हणूनच तुमच्याजवळची वाचून झालेली पुस्तके रद्दीत देऊ नका. आम्हाला दान करा. ती योग्य ठिकाणी पोहोचवली जातील, असे आवाहन सोनल गोडबोले यांनी केले आहे.



























































