सोनाली कुलकर्णीचा दुबईत अनोखा विवाहसोहळा; एक तासात खरेदी अन् 15 मिनिटांत लग्न 

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मराठी चित्रपटसृष्टीतील ‘अप्सरा’ सोनाली कुलकर्णी हिने प्रियकर कुणाल बेनोडेकर याच्यासोबत 7 मे रोजी दुबईमध्ये मोजक्याच पाहुण्यांच्या उपस्थितीत साधेपणाने लग्नगाठ बांधली आहे. आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून आज सोनालीने सोशल मीडियावरून ही आनंदाची बातमी दिली आहे. चाहत्यांपासून सेलिब्रेटींपर्यत सर्वांनी या नवदाम्पत्याला शुभेच्छा दिल्या आहेत.

‘अब से हम 7 मे’ असे कॅप्शन देत सोनालीने लग्न सोहळ्यातील काही फोटो पोस्ट करत सगळ्यांना सरप्राईज दिले आहे. जूनमध्ये यूकेला सोनाली आणि कुणालचे लग्न होणार होते. मात्र अनावश्यक खर्च, सरकारचे नियम आणि कुटुंबीयांच्या आरोग्याचा विचार करता त्यांनी साधेपणाने लग्न करण्याचा निर्णय घेतला. जूनचे जुलै होत असल्याने त्यांनी लग्नसोहळा पुढे ढकलण्याऐवजी मे महिन्यातला मुहूर्त निवडला. सोनालीने आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय, ‘आई-बाबांचा होकार घेऊन आम्ही लगेच तयारीला लागलो. माझे आई-बाबा हिंदुस्थानात, कुणालचे लंडनला, कधी पुन्हा सगळे एकत्र येतील माहीत नाही. म्हटले आताच शिक्कामोर्तब करून टाकू. दोन दिवसात सगळे ठरवले. एका तासात खरेदी आणि 15 मिनिटांमध्ये चार लोकांच्या साक्षीने मंदिरात लग्न केले.