सोनाली नवांगुळ यांना साहित्य अकादमीचा अनुवाद पुरस्कार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

साहित्य अकादमीचे अनुवाद पुरस्कार 2020 आज जाहीर करण्यात आले. मराठी भाषेत हा पुरस्कार सोनाली नवांगुळ यांच्या ‘मध्यरात्रीनंतरचे तास’ या अनुवादित कादंबरीला मिळाला आहे. लेखिका सलमा यांच्या मूळ तमिळ भाषेतील कादंबरीचा हा अनुवाद आहे. 50 हजार रुपये आणि मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

नवी दिल्ली येथे साहित्य अकादमीचे अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर पंबार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत अनुवाद पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. 24 भाषांसाठी पुरस्कार देण्यात आले. मराठी भाषेसाठी बळवंत जेऊरकर, डॉ. प्रतिमा इंगोले, डॉ. सूर्यनारायण रणसुभे यांनी ज्युरी सदस्य म्हणून काम पाहिले.

कोल्हापूरच्या सोनाली नवांगुळ या मुक्त पत्रकार, अनुवादक व निवेदिका म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी 2014 मध्ये पुणे येथे झालेल्या ‘अखिल भारतीय अपंग साहित्य संमेलना’चे अध्यक्षपद भूषविले होते. नवांगुळ यांनी लिहिलेल्या वृत्तपत्रीय सदरांचे संकलन असलेले ‘स्वच्छंद’ हे पुस्तक प्रकाशित झाले आहे. दोन्ही पाय नसताना वेगवान धावू शकणाऱया ऑस्कर पिस्टोरिअस या धावपटूच्या आत्मकथनाचा त्यांनी केलेला अनुवाद ‘ड्रीमरनर’ या नावाने प्रकाशित झाला आहे. ‘मेधा पाटकर-नर्मदा बचाओ आंदोलनाचा बुलंद आवाज’ हे पुस्तकही त्यांनी लिहिले आहे. याशिवाय जयश्री शानभाग यांनी काsंकणीत अनुवादित केलेल्या ‘स्वप्न सारस्वत’ कादंबरीला साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला आहे. गोपालकृष्ण पै यांच्या कन्नड कादंबरीचा हा अनुवाद आहे. मंजुषा कुलकर्णी यांच्या ‘प्रकाश मार्ग’ या संस्कृत पुस्तकाला साहित्य अकादमी सन्मान मिळाला आहे. प्रकाश आमटे यांच्या ‘प्रकाशवाटा’ या आत्मचरित्रपर मराठी पुस्तकाचा हा संस्कृत अनुवाद आहे.