सोनम वांगचुक यांना मेदांता रुग्णालयात हलवणार; दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विद्यार्थ्यांच्या न्यायहक्कासाठी आंदोलन करणारे लडाखचे सामाजिक व पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्याबद्दल महत्त्वाची माहिती समोर आली आहे. सोनम वांगचुक यांना दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयातून मेदांता रुग्णालयात हलवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय दिल्ली उच्च न्यायालयाने दिला आहे. वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली आंगमो यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने हा आदेश जारी केला आहे.

दिल्ली उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींच्या खंडपीठाने हा निर्णय दिला. नीट पेपरफुटीप्रकरणी केंद्रिय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी लडाखचे सामाजिक कार्यकर्ते जंतरमंतरवर उपोषणाला बसले होते. 22 दिवसाच्या उपोषणामुळे त्यांची प्रकृती बिघल्याने न्यायालयाच्या आदेशावरून दिल्ली पोलिसांनी त्यांना उपोषण स्थळावरून उचलून थेट सफदरजंग रुग्णालयात दाखल केले.

याविरोधाच यांच्या पत्नी गीतांजली आंगमो यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. पती सोनम वांगचुक यांना त्यांच्या इच्छेविरुद्ध सफदरजंग रुग्णालयात ठेवण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला होता. कुटुंबाचा सरकारी वैद्यकीय यंत्रणेवर विश्वास राहिलेला नाही, त्यामुळे वांगचुक यांना त्यांच्या पसंतीच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी हलवण्याची परवानगी मिळावी, अशी याचिका गीतांजली आंगमो यांनी केली होती. दिल्ली उच्च न्यायालयाच्या एकल खंडपीठाने ही याचिता फेटळली होती. मात्र, आता उच्च न्यायालयाच्या दुहेरी खंडपीठाने हा निर्णय बदलत वांगचुक यांना मेदांता रुग्णालयात शिफ्ट करण्याचे आदेश दिले आहेत.

न्यायालयाच्या आदेशानुसार, मेदांता रुग्णालयात सोनम वांगचुक यांच्या उपचारासाठी तज्ज्ञ डॉक्टरांचे विशेष पॅनेल स्थापन केले जाईल. सफदरजंग रुग्णालयात आतापर्यंत केलेल्या सर्व वैद्यकीय तपासण्यांचे आणि उपचारांचे अहवाल मेदांता रुग्णालयाच्या डॉक्टरांच्या पॅनेलकडे सुपूर्द करण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत.