
गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा 92 वा वाढदिवस मंगळवारी साजरा झाला. या दिवशी त्यांच्या चाहत्यांना खास भेट मिळाली. गीतकार गुलजार आणि संगीतकार विशाल भारद्वाज यांनी लता मंगेशकर यांचे 26 वर्षांपूर्वीचे एक गाणे नव्या अंदाजात रिलीज केले.
1996 साली विशाल भारद्वाज आणि गुलजार यांनी ‘माचिस’ सिनेमासाठी एकत्र काम केले होते. त्याच दिवसांत ही जोडी ऐश्वर्या राय बच्चनच्या एका सिनेमासाठी काम करत होती. मात्र काही कारणांमुळे तो सिनेमा कधीच प्रदर्शित झाला नाही. त्या सिनेमासाठी लता मंगेशकर यांनी ‘ठीक नहीं लगता’ हे गाणे गायले होते. मात्र सिनेमा प्रदर्शितच न झाल्याने हे गाणेही प्रदर्शित झालेले नाही. ते आज दीदींच्या वाढदिवसाला रिलीज करण्यात आले. एवढेच नव्हे, तर हे गाणे नंतर एका सिनेमासाठी वापरले जाणार आहे.
याविषयी विशाल भारद्वाज यांनी सांगितले की, हे गाणे दोन दशकांपूर्वी कम्पोज झाले होते. त्याला आता रिऑर्केस्ट्रेट करून रिलीज करण्यात आले आहे. ज्या सिनेमासाठी गाणे तयार केले होते, दुर्दैवाने तो सिनेमा आलाच नाही. सिनेमा प्रदर्शित होईल असे सांगितले जात होते. त्यातच 8-10 वर्षे गेली. पुढे ते गाणेच हरवले. त्यानंतर मी 10-12 वर्षांपूर्वी गाण्याचा शोध सुरू केला. एका बंद होणाऱया स्टुडिओमध्ये मला एक टेप मिळाली. त्या टेपमध्ये काही गाणी होती. त्यामध्ये लता मंगेशकर यांनी गायलेले गाणेही होते.






























































