दरड कोसळण्याच्या घटनांमुळे सोनगिरी येथे महामार्ग बनला धोकादायक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

संगमेश्वर परिसरात गेले आठवडाभर पावसाची संततधार सुरु असून यामुळे मुंबई गोवा महामार्ग अत्यंत धोकादायक बनला आहे. राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकारी वर्गाचे दुर्लक्ष ठेकेदार कंपन्यांचा बेजबाबदारपणा याचा फटका वाहनचालक आणि पादचाऱ्यांना बसत असतांनाच महामार्गावरील कोळंबे- सोनगिरी दरम्यान दरड कोसळल्याने रस्यावरील वाहतूक एकेरी करण्यात आली होती. दरडीचा मोठा भाग महामार्गावर आला यावेळी सुदैवाने कोणतेही वाहन नसल्याने मोठा अनर्थ टळला.

आठ दिवसापूर्वी याच ठिकाणी मोरी खचल्याची घटना घडली होती. खोदलेली माती नदीच्या बाजूला टाकतांना मोरीचे पूर्वीचे पाईप बुजले गेले. परिणामी जोरदार पाऊस कोसळताच वेगाने आलेल्या पाण्याने रस्त्याचा भरावच वाहून नेला. यामुळे येथील मार्ग तर धोकादायक बनलाच शिवाय भरावाची सर्व माती थेट नदीला जावून मिळाल्याने नदी गाळाने भरु लागली आहे. सोनगिरी येथे खचलेल्या भरावाजवळ काम सुरु असतानाच बाजूला दरड कोसळल्याने रस्त्यावर माती, दगड आले होते. मात्र माती रस्त्यावर आल्याने दुचाकी घसरण्याचे प्रकार घडत होते. जेसीबीच्या सहाय्याने सायंकाळी उशिरापर्यंत दरड उचलण्याचे काम चालू होते. दरड कोसळल्यामुळे महामार्गावरील वाहतूक एकेरी आणि मंदगतीने सुरु होती.

संगमेश्वर नजिकच्या निढळेवाडी येथे दरड कोसळल्याने एका घराला धोका निर्माण झाला आहे. तर तळेकांटे येथे मोठ्या दगडी खाली आल्या आहेत. परंतु त्या एकमेकांमध्ये अडकल्याने आणखी माती खाली आल्यास हेच दगड रस्त्यावर येऊन अपघात होऊ शकतो याबाबत खात्याने तातडीने लक्ष देणे गरजेचे आहे अन्यथा असे प्रकार वारंवार होऊ शकतात.

हे सारे गंभीर प्रकार पाहिल्यानंतर राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांनी आरवली ते निवळी या अपघातप्रवण क्षेत्राची पाहणी करुन पावसाळ्यापूर्वी करावयाच्या आवश्यक उपाययोजना केलेल्या नाहीत असा आरोप वाहनचालकांनी केला आहे. ठेकेदार कंपन्या बेजबाबदार वागत असतांना अधिकारी वर्गही आपली जबाबदारी निभावत नसल्याने वाहनचालक आणि पादचारी त्रस्त झाले आहेत.