
कोरोना संकटाने सर्व जग वेठीस धरले आहे. या संकटाच्या काळात समाजातील माणुसकीचे दर्शन झाले. तसेच काही ठिकाणी माणसातील क्रौर्य आणि अमानवीय घटनाही उघडकीस आल्या आहेत. कोरोनाबाधितांची मदत करण्यासाठी कोरोनायोद्धे जीव संकटात घालून प्रयत्नांची शर्थ करत आहेत. तर आपल्या 82 वर्षांच्या आईला कोरोनाची लागण झाली आहे, असे समजताच तिच्या चारही मुलांनी तिला शेतात सोडून पळ काढल्याची घटना उघडकीस आली आहे. तेलंगणामध्ये ही घटना घडली आहे.
तेलंगणात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यातच एका 82 वर्षांच्या वृद्धेला कोरोनाची लागण झाली. ही महिला कोरोनाबाधित असल्याचे तिच्या चार मुलांना समजताच त्यांनी स्वतःला लागण होऊ नये म्हणून वृद्ध आईला शेतातील पडक्या घरात राहण्यास पाठवले. त्यानंतर आईमुळे आपल्याला कोरोनाची लागण होईल अशी शंका त्यांच्या मनात येत असल्याने त्यांनी आईला वारंगळमधील एका शेतात सोडून पळ काढला आहे. या वृद्ध महिलेचे नाव लाचम्मा आहे. या घटनेबाबत सर्व स्तरातून संताप व्यक्त होत आहे. वृद्ध आईवर औषधोपचार करण्याऐवजी जन्मदातीला शेतात सोडून मुलांनी पळ काढल्याबाबत संताप व्यक्त होत आहे.
लाचम्मा वॉकरच्या मदतीशिवाय चालूही शकत नाही. अशा स्थितीतच त्यांना मुलांनी शेतात सोडले आहे. त्यामुळे वेलरू मंडळजवळ एका विहिरीजवळ ही वृद्धा दिवस कंठत होती. लाचम्माला एक मुलगीही आहे. आपल्या आईला भावांनी शेतात सोडल्याचे समजताच ती मुलगी आईची काळजी घेण्यासाठी आली आहे. आपली काळजी घेण्यासाठी मुलगी आल्याने वद्धेला दिलासा मिळाला आहे. मात्र, आपल्या मुलांनी आपल्याला वाऱ्यावर सोडल्याच्या धक्क्यातून ती अजून सावरलेली नाही.



























































