
‘नेटवर्क 18 मीडिया अॅण्ड इन्व्हेस्टमेंट लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स खरेदी करण्यासाठी जपानची ‘सोनी कॉर्पोरेशन’ कंपनी चर्चा करत आहे. ‘ब्लूमबर्ग’ या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, सोनी कंपनी हिंदुस्थानात कंटेन्टची वाढती मागणी पाहता मुकेश अंबानी यांच्या नियंत्रणाखाली असलेल्या ‘इंडियन टेलिव्हिजन नेटवर्क’मध्ये भागभांडवल खरेदी करण्यासाठी चर्चा करत आहे.
या वृत्तानुसार, अद्याप दोघांमधील चर्चा ही सुरुवातीच्या टप्प्यात आहे. यासंदर्भात विचारले असता रिलायन्स इंडस्ट्रीच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, ‘कंपनीच्या धोरणानुसार आम्ही मीडियाने दिलेल्या बातमीच्या आधारे भाष्य करत नाही. आम्ही इंडियन सिक्युरिटी आणि एक्सचेंज बोर्ड अॅक्ट 2015 च्या अनुसार आपल्या जबाबदाऱ्या आणि शेअर्स बाजाराशी केलेल्या कराराच्या अनुषंगाने आवश्यक ते खुलासे करू, जसे की आतापर्यंत केले गेले आहेत.’
या वृत्तात असे नमूद केले गेले आहे की, सोनी अनेक संभाव्य कराराच्या रणनीतींवर विचार करत आहे. ज्यात शेअर्स खरेदी करण्यासाठी बोली लावणे किंवा हिंदुस्थानात नेटवर्क 18 च्या मनोरंजन वाहिनीत विलिनीकरणाचा समावेश आहे.

























































