
‘छोटी हेलन’ म्हणून ओळखली जाणारी पुण्यातील सौम्या कांबळे हिने ‘इंडियाज बेस्ट डान्सर’ या किताबावर आपले नाव कोरले आहे. सौम्याला मारुती सुझुकी स्विफ्ट कार आणि सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनतर्फे 15 लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला तर तिची कोरिओग्राफर वर्तिका झा हिला 5 लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला आहे. सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील इंडियाज बेस्ट डान्सर – सीजन 2 ची महाअंतिम फेरी नुकतीच दिमाखात पार पडली. अंतिम फेरीत सर्वोत्तम पाच स्पर्धकांमध्ये विजेतेपदासाठी चुरस रंगली त्यात सर्वांवर मात करत सौम्या बेस्ट डान्सर ठरली आहे. अंतिम फेरीतील 5 स्पर्धकांपैकी जयपूरच्या गौरव सरवण याने दुसरा तर ओडिशाच्या रोझा राणा हिने तिसरा क्रमांक पटकावला. चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर अनुक्रमे आसामच्या रक्तिम ठाकुरिया आणि केरळच्या झमरूध यांना समाधान मानावे लागले.
आशा भोसले यांच्याकडूनही कौतुक
सौम्या कांबळे हिच्या नृत्याच्या ज्येष्ठ गायिका आशा भोसले यादेखील मोठय़ा फॅन आहेत. तिचा डान्स पाहून आशा भोसले इतक्या प्रभावित झाल्या की, त्यांनीच तिला ‘छोटी हेलन’ हा किताब दिला. सौम्याने डॉक्टर बनावे अशी तिच्या वडिलांची इच्छा होती तर आईला तिने डान्सर बनावे असे वाटत होते, मात्र आपल्या कलेशी तडजोड न करता सौम्याने इंडियाज बेस्ट डान्सर हा किताब पटकावला आहे.
माझ्यासाठी या स्वप्नवत प्रवासाचे वर्णन करण्यासाठी शब्द नाहीत. मी भारावून गेले आहे. या प्रवासात ज्यांनी मला साथ दिली त्या सर्वांचे मनापासून आभार. विशेषतः माझी कोरिओग्राफर वर्तिका हिचे ऋण मी कधीच विसरणार नाही. या प्रवासात मला खूप काही शिकायला मिळाले. भविष्यात काय लिहिलेले आहे, हे मला माहीत नाही, पण डान्स हा माझ्या भविष्याचा नक्कीच महत्त्वाचा भाग असेल.
सौम्या कांबळे, विजेती



























































