
टी-20 क्रिकेटमध्ये चौफेर उधळलेला टीम इंडियाचा विजयरथ अखेर दक्षिण आफ्रिकेने रोखला. लागोपाठ 12 टी-20 सामने जिंकणाऱया हिंदुस्थानने एक विजय मिळवला असता तर सलग 13 सामने जिंकणारा तो पहिला संघ ठरला असता. मात्र पाहुण्या दक्षिण आफ्रिकेने 212 धावांचे आव्हानात्मक लक्ष्य 19.1 षटकांत केवळ 3 फलंदाजांच्या मोबदल्यात पूर्ण केले. या विजयासह दक्षिण आफ्रिकेने पाच सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी मिळवली.
तत्पूर्वी, नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने 4 बाद 211 धावसंख्या उभारली. सलामीवीर इशान किशन (76) व ऋतुराज गायकवाड (23) यांनी 6.2 षटकांत 57 धावांची खणखणीत सलामी दिली. त्यानंतर श्रेयस अय्यर (36), कर्णधार रिषभ पंत (29) व हार्दिक पांडय़ा (नाबाद 31) या सर्वांनी आक्रमक फलंदाजी केल्याने हिंदुस्थानला 200 धावांचा टप्पा ओलांडता आला. दक्षिण आफ्रिकेकडून केशव महाराज, एन्रीच नॉर्तजे, वायने पार्नेल व ड्वेन प्रेटोरियस यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
डय़ुसेन-मिलर जोडी ठरली यजमानांसाठी किलर
द्विशतकी लक्ष्याचा पाठलाग करताना क्विंटन डिकॉक (22), कर्णधार तेम्बा बावुमा (10) व ड्वेन प्रेटोरियस (29) ही आघाडीची फळी अपयशी ठरली. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेची 8.4 षटकांत 3 बाद 81 अशी स्थिती झाली होती. मात्र त्यानंतर रॅसी वॅनडर डुसेन (नाबाद 75) व डेव्हिड मिलर (नाबाद 64) यांनी चौथ्या विकेटसाठी 131 धावांची अभेद्य भागीदारी करीत दक्षिण आफ्रिकेला सनसनाटी विजय मिळवून दिला. हिंदुस्थानकडून भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल व अक्षर पटेल यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.






























































