केरळमधील वायनाडमध्ये निसर्गाचा कोप पाहायला मिळत आहे. अतिवृष्टीमध्ये झालेल्या भूस्खलनामुळे आत्तापर्यंत 334 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला असून अजूनही अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना वाचविण्यासाठी केरळ राज्याची बचाव पथके, एनडीआरएफ, नौदल आणि लष्कराचे जवान ठिकठिकाणी दलदलीत उतरून भरपावसातदेखील कार्यरत आहेत. केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनीही या आपत्तीग्रस्त लोकांसाठी मदत निधीची घोषणा केली आहे. आता सर्व सामान्यांसोबतच दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील कलाकारही गरजूंना मदत करण्यासाठी पुढे सरसावले आहेत.
सुप्रसिद्ध अभिनेत्री नयनतारा आणि विघ्नेश शिवन यांनी वायनाडमधील आपत्तीग्रस्तांकरीता 20 लाखांची आर्थिक मदत देऊ केली आहे. नयनतारा आणि विघ्नेश यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम हँडलवर संयुक्त निवेदन शेअर केले आहे. तमिळ अभिनेता चियान विक्रम याने देखील आपत्तीग्रस्तांना 20 लाखांची मदत केली आहे. विक्रमचे व्यवस्थापक युवराज यांनी त्याच्या वतीने “X” वर ही बातमी शेअर केली आहे.
मळ्याळम अभिनेता दुलकर सलमान व त्याचे वडील मामूट्टी यांनी एकत्रितपणे 35 लाखांची देणगी दिली आहे. याबाबत मामूट्टी यांनी पत्रकारांशी संवाद साधत माहिती दिली. यावेळी ” सध्या मी मदतीच्या उपाययोजनांसाठी थोडी रक्कम दिली आहे. गरज पडल्यास मी आणखी योगदान देईन. ते सगळे आपल्या सारखेच लोक आहेत त्यांचे आयुष्य दोन दिवसात बदलले आहेत. त्यांना आमच्या मदतीची गरज आहे आणि त्यांना मदत करणे आपले कर्तव्य आहे” असे त्यांनी म्हटले आहे.
अभिनेता फहाद फासिल आणि नाझरिया नाझीम यांनी देखील पीडितांसाठी 25 लाखांची देणगी दिली आहे. तसेच दाक्षिणात्य चित्रपट व बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाने छाप पाडणारी अभिनेत्री रश्मिका मंदाना हि देखील आपत्तीग्रस्तांसाठी पुढे सरसावली आहे. तिने देखील 10 लाखांची मदत देऊ केली आहे.