बालसुब्रमण्यम अनंतात विलीन, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

ज्येष्ठ पार्श्वगायक एस.पी. बालसुब्रमण्यम अनंतात विलीन झाले आहेत. शनिवारी दुपारी त्यांच्या पार्थिवावर चेन्नई येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. तामिळनाडू पोलिसांकडून त्यांना 24 बंदुकांची सलामी देण्यात आली. त्यानंतर त्यांचे पार्थिव दफन करण्यात आले. कुटुंबीयांसह, सेलिब्रिटी आणि शेकडो चाहत्यांच्या उपस्थितीत त्यांना शेवटचा निरोप देण्यात आला.

तब्बल 16 हिंदुस्थानी भाषांतील 40 हजारांहून अधिक गाणी गाणारे ज्येष्ठ पार्श्वगायक एस. पी.बालसुब्रमण्यम (वय 74) यांचे शुक्रवारी दुपारी चेन्नई येथील एमजीएम रुग्णालय निधन झाले होते. कोरोनाची लागण झाल्याने 5 ऑगस्ट रोजी त्यांना रुग्णालयात दाखल केले होते. त्यांनी कोरोनावर मात देखील केली होती. मात्र प्रकृती अधिक खालावल्याने शुक्रवारी दुपारी त्यांनी जगाचा कायमचा निरोप घेतला. बालसुब्रमण्यम यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी तिरुवल्लूर जिल्ह्यातील तमराइपक्कम येथील त्यांच्या रेड हिल्स फार्महाऊसमध्ये ठेवले होते. यावेळी आपल्या लाडक्या गायकाचे शेवटचे दर्शन घेता यावे यासाठी चाहत्यांनी एकच गर्दी केली होती. त्यामुळे पोलिस सुरक्षा वाढवण्यात आली होती. त्यानंतर आज दुपारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

आपली प्रतिक्रिया द्या