
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
हिंदुस्थानातील बँकांना नऊ हजार कोटी रुपयांचा चुना लावून लंडनमध्ये जाऊन लपलेल्या मद्यसम्राट विजय मल्ल्याला विशेष न्यायालयाच्या न्यायाधीशांनी आज जोरदार दणका दिला. राजकीय सूडभावनेपोटी त्याला हिंदुस्थानात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत हा मल्ल्याचा दावाच न्यायाधीशांनी खोडून काढला. मल्ल्या अशा प्रकारचा दावा करून ब्रिटनमध्ये राहू शकत नाही असे न्यायाधीशांनी यावेळी बजावले.
विशेष न्यायालयाचे न्यायाधीश एम. एस. आझमी यांनी मल्ल्याला फरार आर्थिक गुन्हेगार म्हणून घोषित केले होते. या प्रकरणात काहीतरी तर्पवितर्प लढवून स्वतःला कायद्याचे पालन करणारा नागरिक म्हणून मल्ल्या कोर्टासमोर उभा राहत आहे. या ठिकाणी राजकीय सूडापोटी हिंदुस्थानने त्याच्या प्रत्यार्पणाचा घाट घातल्याचा मल्ल्याचा दावा आझमी यांनी फेटाळून लावला. दरम्यान, विशेष न्यायालयाने 5 जानेवारीलाच मल्ल्याला फरार आर्थिक गुन्हेगार म्हणून घोषित केले होते. अशा प्रकारे पहिल्यांदाच ‘आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक’ कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे.
मल्ल्याकडून कुठलाही राजकीय फायदा नाही
मल्याच्या अटकेमुळे कुठला राजकीय फायदा होईल असा एकही पुरावा न्यायालयात सादर करण्यात आलेला नाही. त्यामुळे राजकीय सूडापोटी त्याच्यावर सरकार कारवाई करत असल्याचे सिद्ध होत नसल्याकडे न्यायालयाने लक्ष वेधले.
अटकेपासून वाचण्यासाठी मल्ल्याने हिंदुस्थान सोडला नाही
मल्या आपल्या व्यावसायिक बैठकीसाठी हिंदुस्थानबाहेर गेला असून त्याने अटकेपासून वाचण्यासाठी असे केलेले नाही असा दावा मल्ल्याच्या वकिलांनी मार्च 2016 मध्ये केला होता. ही बैठक पूर्वनिर्धारित होती. मल्ल्या कायद्याचे पालन करणारा हिंदुस्थानी नागरिक असल्याचेही त्यांनी म्हटले होते. दरम्यान, ब्रिटनच्या एका न्यायालयाने डिसेंबरमध्येच मल्ल्याच्या हिंदुस्थानात प्रत्यार्पण करण्याला मंजुरी दिली होती.


























































