मास्टर दीनानाथ यांचा स्वरप्रवास आज उलगडणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ज्येष्ठ संगीत नाटक कलावंत, गायक मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या 79 व्या पुण्यतिथीचे औचित्य साधून शनिवार 24 एप्रिल रोजी रात्री 9 वाजता एबीपी माझावर ‘स्वर मंगेश’ हा एक खास कार्यक्रम प्रसारित होणार आहे. या कार्यक्रमात मास्टर दीनानाथांचा स्वरप्रवास उलगडला जाणार आहे.

गेली अनेक वर्ष मंगेशकर कुटुंबियांकडून मास्टर दीनानाथांच्या पुण्यतिथीला एका मोठय़ा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. विविध क्षेत्रात चांगलं काम करणाऱया दिग्गजांचा या कार्यक्रमात दीनानाथ मंगेशकर पुरस्कार देऊन गौरवही करण्यात येतो. पण कोरोनामुळं गेली दोन वर्ष या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेले नाही. त्यामुळे यंदा दीनानाथ मंगेशकरांच्या पुण्यतिथीला या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांचा संगीत-नाटय़ क्षेत्रातील प्रवास उलगडण्याचा प्रयत्न मंगेशकर कुटुंबीय आणि एबीपी माझाच्या वतीनं करण्यात येणार आहे.

मंगेशकर कुटुंबीयांच्या पुढाकाराने ‘स्वर मंगेश’ या माहितीपटाची निर्मिती करण्यात आली आहे. या कार्यक्रमाचं खास आकर्षण म्हणजे भारतरत्न लता मंगेशकर आपल्या बाबांबद्दलच्या आठवणींना उजाळा देणार आहेत. त्याचबरोबर अनेक वर्षांच्या मेहनतीनंतर शोधलेली दीनानाथांच्या लहानपणापासूनची दुर्मिळ छायाचित्रंही या माहितीपटात आहेत.

याशिकाय ज्येष्ठ अभिनेते भालचंद्र पेंढारकर, चित्तरंजन कोल्हटकर, चंद्रकांत गोखले, अशोक रानडे यांच्यासह विविध पिढय़ांमधल्या दिग्गज कलाकारांनी दीनानाथांच्या संगीतविश्वातील योगदानाबद्दल व्यक्त केलेल्या भावनांचं संकलनही या माहितीपटात करण्यात आलं आहे. या कार्यक्रमाची संहिता ज्येष्ठ गायिका शैला दातार यांची आहे, तर कार्यक्रमासाठी विशेष सहाय्य त्यांच्या मानसकन्या प्राची देवल यांनी केलं आहे.