
सामना प्रतिनिधी, मुंबई
ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर यांना आज आपले सरकारविरोधी भाषण अर्ध्यावरच सोडावे लागले. आयोजकांनीच त्यांना तसे सुनावल्याने सभागृहात एकच गोंधळ उडाला.
राष्ट्रीय कला अकादमीत आज अमोल पालेकर यांना एका कार्यक्रमासाठी निमंत्रित करण्यात आले होते. त्यावेळी अमोल पालेकर यांनी नयनतारा सेहगल यांचा संदर्भ देत सरकारविरोधी भाषण सुरू केले. नुकत्याच पार पडलेल्या यंदाच्या साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षा म्हणून निवडल्या गेलेल्या नयनतारा सेहगल यांच्या नियोजित भाषणावरून प्रचंड गदारोळ उडाला होता. नयनतारा यांचे भाषण सरकारविरोधी असल्याचे सांगत आयोजकांनी त्यांचे निमंत्रणच मागे घेतले होते. त्यावरून साहित्य क्षेत्रात जोरदार टीकाही झाली होती. नंतर शिवाजी मंदिर सभागृहात सेहगल यांना सन्मानाने निमंत्रित करून काही साहित्यिकांनी त्यांची जाहीर माफीही मागितली होती.
या सर्व घटनांचा संदर्भ देत अमोल पालेकर आज भाषण करण्यासाठी उभे राहिले, पण पालेकर यांच्या भाषणाचा सूरही सरकारविरोधी आहे हे लक्षात येताच संयोजकांनी माईकचा ताबा घेतला आणि नयनतारा यांच्यावरील अन्यायाचा पाढा वाचण्याची ही जागा आणि ही वेळ नव्हे असे पालेकर यांना सुनावले. आयोजक एवढय़ावरच थांबले नाहीत तर पालेकर यांनी आपले भाषण आता थांबवावे अशी सूचनाही त्यांनी केल्याने एकच गोंधळ उडाला.



























































