झाडांवर खिळे ठोकून जाहिराती करणाऱयांवर दंडात्मक कारवाई, कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांचा इशारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

झाडांना इजा पोहोचविणे, त्याच्यावर खिळे ठोकणे अशा प्रकारचे कृत्य कायद्याने गुन्हा आहे. यापुढे झाडांवर खिळे ठोकणे तसेच जाहिरातींचे फलक लावणाऱयांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा इशारा गृहराज्यमंत्री तथा पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिला आहे. दरम्यान, पर्यावरणाची होणारी हानी आणि येणाऱया काळात वृक्षसंपदेची गरज पाहाता, खिळेमुक्त झाडांची मोहीम राज्यभर हाती घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.

‘झाडे लावा झाडे जगवा’ असा संदेश देताना, झाडांनासुद्धा संवेदना असल्याचा विसर पडल्याचे दिसून येते. अनेक ठिकाणी झाडांवर खिळे, जाहिरातींचे फलक, तारा, अँगल, लोखंडी ब्रॅकेट मारल्याचे दिसून येते. यामुळे झाडांच्या वाढीवर विपरित परिणाम होतो.

ही बाब लक्षात घेऊन शहरात ‘खिळेमुक्त झाडांचं कोल्हापूर’ ही विशेष मोहीम राबविण्याची संकल्पना पालकमंत्री सतेज पाटील यांनी गेल्या आठवडय़ात शहरातील विविध स्वयंसेवी संस्थांच्या समोर मांडली, तर आजपासून प्रत्यक्ष या मोहिमेला छत्रपती ताराराणी चौक, कावळा नाका येथून मोठय़ा उत्साहात सुरुवात झाली. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

पालकमंत्री सतेज पाटील यांच्यासह आमदार ऋतुराज पाटील, आमदार चंद्रकांत जाधव यांनी स्वतः या मोहिमेत सहभाग घेत, झाडांवरील फलक काढले. यावेळी हा उपक्रम सातत्याने पुढे सुरूच ठेऊ, असा निर्धार सहभागी स्वयंसेवी संस्थांनी केला. ‘एकच नारा एकच सूर, खिळेमुक्त कोल्हापूर’ अशा घोषणा देत यावेळी जनजागृतीदेखील करण्यात आली.

रोटरी क्लबच्या विविध शाखांसह, व्हाइट आर्मी निसर्ग मित्र, मैत्रेय प्रतिष्ठान, वृक्षप्रेमी वेल्फेअर ऑर्गनायझेशन, डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग, कोल्हापूर हॉटेल मालक संघ, कोल्हापूर ट्रव्हल एजंट्स असोसिएशन, राष्ट्रीय सेवा योजना, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर आर्ट फाउंडेशन, विज्ञान प्रबोधिनी आदी पन्नासहून अधिक स्वयंसेवी संस्था आणि शेकडो वृक्षप्रेमी कोल्हापूरकरांनी ठिकठिकाणी या मोहिमेत स्वयंस्फूर्तीने सहभाग घेतला.

त्यामुळे गेल्या कित्येक वर्षांपासून खिळे, जाहिरातींचे फलक, तारा, अँगलच्या विळख्यातून शेकडो वृक्षांनी मोकळा श्वास घेतला. शहरात महानगरपालिकेच्या हद्दीत मोजणी झालेली साडेपाच लाख झाडे असून, आज पहिल्याच टप्प्यात एक लाख झाडे खिळेमुक्त करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते.