पावसामुळे दुसरा वन-डे सामना रद्द, एक दिवसीय लढती रद्द होण्याचा विक्रमही टीम इंडियाच्या नावावर

टीम इंडिया आणि यजमान न्यूझीलंड संघांतील दुसरा एकदिवसीय सामना दोनदा आलेल्या पावसाच्या जोरदार व्यत्ययामुळे अखेर 12.5 षटकेच पूर्ण झाल्यावर रद्द घोषित करण्यात आला. हिंदुस्थानी संघाचा हा 42 वा एकदिवसीय क्रिकेट सामना रद्द झाला आहे. त्यामुळे पाऊस आणि अन्य कारणांमुळे वन-डे सामना रद्द होण्याचा आगळा विक्रमही टीम इंडियाच्या नावावर नोंदवला गेला आहे. आजच्या सामन्यात पावसाच्या वारंवार व्यत्ययात हिंदुस्थानी संघाने प्रथम फलंदाजी करताना 12.5 षटकांत 1 बाद 89 धावा केल्या होत्या. या निर्णयामुळे हिंदुस्थानी संघ 3 वन-डेच्या मालिकेत 0-1 असा पिछाडीवर आहे आणि मालिका बरोबरीत सोडवण्यासाठी पाहुण्या संघाला अखेरच्या तिसऱया लढतीत ‘करा अथवा मरा’ बाण्याने जोरदार झुंज द्यावी लागणार आहे.

आंतराष्ट्रीय वन-डे सामने रद्द होण्याचा विश्वविक्रम टीम इंडियाच्याच नावावर आहे. कारण हिंदुस्थानचा प्रत्येक 25 वा एकदिवसीय सामना पाऊस अथवा अन्य कारणाने रद्द होण्याचा विक्रम आहे. आता हा 42 वा एकदिवसीय सामना पावसाच्या व्यत्ययामुळे रद्द झाला आहे. हिंदुस्थान पाठोपाठ न्यूझीलंडचे 41 वन-डे सामने रद्द झाले आहेत. हिंदुस्थान आतापर्यंत 162 एकदिवसीय सामने खेळला आहे, त्यातील 11 लढती कोणत्या ना कोणत्या कारणांसाठी रद्द झाल्या आहेत. त्यात 2002 च्या चॅम्पियन ट्रॉफी अंतिम लढतीचा समावेश आहे.