
हिंदुस्थानची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा हिने क्रोएशियाच्या मेट पाविकच्या साथीत विम्बल्डन ग्रॅण्डस्लॅम टेनिस स्पर्धेतील मिश्र दुहेरीच्या उपांत्य फेरीत धडक दिली. कारकीर्दीतील अखेरची विम्बल्डन खेळत असलेल्या सानियाने प्रथम या स्पर्धेची उपांत्य फेरी गाठल्याने तिच्यासाठी ही ऐतिहासिक कामगिरी ठरली.
सहाव्या मानांकित सानिया-पॅविक जोडीने चुरशीच्या उपांत्यपूर्व लढतीत कॅनडाची गॅब्रिएला डाब्रोवस्की व ऑस्ट्रेलियाचा जॉन पीयर्स या जोडीचा 6-4, 3-6, 7-5 असा पराभव केला. ही लढत एक तास 41 मिनिटांपर्यंत रंगली. सानियाला शेवटची विम्बल्डन स्पर्धा संस्मरणीय ठरविण्यासाठी केवळ दोन विजयांची गरज आहे. त्यामुळे ती या स्पर्धेचे विजेतेपद पटकावण्यासाठी उर्वरित लढतीत जिवाचे रान करताना दिसेल एवढे नक्की. या स्पर्धेच्या महिला दुहेरीत सानिया मिर्झाची डाळ शिजली नाही.
नदाल, हालेपची घोडदौड
स्पेनचा स्टार टेनिसपटू राफेल नदाल आणि रोमानियाची सिमोना हालेप यांनी विम्बल्डनएकेरीतील आपली विजयी घोडदौड सुरूच ठेवली आहे. द्वितीय मानांकित 36 वर्षीय नदालने नेदरलॅण्डच्या बॉटिक वॅन डे जांडशुल्पचा 6-4, 6-2, 7-6 असा पराभव करीत उपांत्यपूर्व फेरी गाठली. महिला एकेरीत 16 व्या मानांकित सिमोना हालेपने चतुर्थ मानांकित स्पेनच्या पाउला बाडोसा हिचा 6-1, 6-2 असा सरळ सेटमध्ये धुव्वा उडवला.
ग्रॅण्डस्लॅम जिंकून सहा वर्षे झाली
सानिया मिर्झाने कारकीर्दीतील अखेरचा ग्रॅण्डस्लॅम किताब जिंकून आता सहा वर्षे झाली आहेत. 2016 मध्ये तिने ऑस्ट्रेलियन ओपनच्या महिला दुहेरीचे विजेतेपद पटकावले होते. 2015 मध्ये सानियाने विम्बल्डन स्पर्धेतही महिला दुहेरीचे विजेतेपद जिंकले होते. मिश्र दुहेरीत तिने 2014 मध्ये ग्रॅण्डस्लॅम जेतेपद पटकावले होते. सानियाच्या नावावर 7 ग्रॅण्डस्लॅम विजेतीपदे आहेत.

























































