
सोन्याची लंका म्हणविली जाणारी श्रीलंका प्रचंड आर्थिक संकटाचा सामना करत आहे. यामुळे श्रीलंकेतील परिस्थिती बिटक झाली असून जीवनावश्यक वस्तूंसाठीही नागरिकांची फरपट होत आहे. महागाईचे आकडे अंगावर काटा आणत असतानाच श्रीलंकेने घेतलेल्या एका निर्णयामुळे हा देश चीनच्या कर्जाच्या जाळ्यामध्ये पूर्णपणे अडकत चालल्याचे दिसत आहे.
हिंदुस्थानची साथ सोडून चीनसोबत गेलेल्या श्रीलंकेची अवस्था ‘न घरका ना घाटका’ झाली आहे. चीनकडून हवे तेवढे कर्ज मिळत असल्याने हवेत असल्याल्या श्रीलंकेचे पाय गाळात रुतत चालले आहेत. चीनकडून श्रीलंकेने पाच अब्ज डॉलरचे कर्ज घेतलेले आहे. हे कर्ज फेडताना श्रीलंकेच्या नाकीनऊ आले असून चिन्यांचे हे कर्ज फेडण्यासाठी श्रीलंका पुन्हा चिन्यांकडूनच कर्ज घेणार आहे. श्रीलंकेच्या सरकारने मंगळवारी याबाबत माहिती दिली.
श्रीलंकेकडील परकीय गंगाजळ जवळपास संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे. लंकेकडे जेमतेम दोन-सव्वादोन अब्ज डॉलर्सचे परकीय चलन शिल्लक आहे. मात्र श्रीलंकेला यंदाच्या वर्षी सात अब्ज डॉलरची परतफेड करायची असून पुढील पाच वर्षांमध्ये 25 अब्ज डॉलर चुकवावे लागणार आहेत. परकीय चलनाचा तुटवडा असल्याने जीवनावश्यक वस्तूंची खरेदीही करता येत नाहीय. यामध्ये खाद्यपदार्थ, इंधन आणि अन्य आवश्यक गोष्टींचाही समावेश आहे.
दरम्यान, श्रीलंकेतील चीनचे राजदूत क्यू झेनहॉन्ग यांनी चीन श्रीलंकेला सर्वतोपरी मदत करण्यासाठी तयार असल्याचे म्हटले आहे. तसेच बीजिंग श्रीलंकेला कर्जाच्या सापळ्यात अडकवत असल्याच्या वावड्यांचीही त्यांनी खिल्ली उडवली. कर्जाचा सापळा हे मिथक असून परदेशी माध्यमे आणि राजकारणी जाणूनबुजून हा भ्रम पसरवत असल्याचे त्यांनी म्हटले.
चीनने श्रीलंकेला विमानतळ, रस्ते आणि बंदरांचा विस्तार करण्यासाठी कर्ज दिले आहे. मात्र या विकासकामांच्या माध्यमातून अपेक्षित परतावा श्रीलंकेला मिळत नाहीय. कोविडच्या काळामुळेही श्रीलंकेची पुरती वाताहात झाल्याचे पाहायला मिळाले.






























































