श्रीलंकन महिलेने घेतले शबरीमलामध्ये दर्शन 

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
सामना ऑनलाईन । कोची
केरळमधील शबरीमला मंदिरात दोन महिलांनी दर्शन घेतल्यावरून हिंसाचार सुरू असतानाच गुरुवारी रात्री एका 46 वर्षीय श्रीलंकन महिलेने देखील शबरीमलामध्ये प्रवेश करत भगवान अय्यपाचे दर्शन घेतले. सुरुवातीला या महिलेने तिला दर्शन घेऊ दिले नसल्याचे जाहीर केले होते. मात्र आता त्या महिलेला पोलिसांनी सुरक्षित ठिकाणी पोहोचवल्यानंतर त्या महिलेचा दर्शन घेतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
शशिकला असे त्या महिलेचे नाव असून पोलिसांनी मंदिरातील सीसीटीव्ही फुटेज जारी केले आहेत. त्यात शशिकला ही पूजेचे सामान घेऊन मंदिरात प्रवेश करत असल्याचे दिसते आहे. शशिकलाने गुरुवारी रात्री साडे नऊच्या सुमारास मंदिरात दर्शन घेतले. शशिकलाने शुक्रवारी सकाळी तिने दर्शन घेतले नसल्याचे जाहीर केले होते. ‘मी जेव्हा मंदिरातील सुवर्ण पायऱ्यांजवळ पोहोचले. तेव्हा पोलिसांनी मला अडवले. मी त्यांना माझी मासिक पाळी बंद झाल्याचा वैद्यकीय अहवाल पण दाखवला पण त्यांनी माझे न ऐकता मला तेथून जाण्यास सांगितले’ असे शशिकलाने जाहीर केले होते.
सर्वोच्च न्यायालयाने शबरीमला मंदिरात महिलांच्या प्रवेशाला अनुमती दिलेली असताना देखील अद्याप कोणत्याही महिलेला मंदिरात प्रवेश देण्यात आला नव्हता. मात्र 2 जानेवारीला बिंदू व कनकदुर्गा या दोन चाळीशीतील महिलांनी शबरीमला मंदिरात प्रवेश केला होता. त्यानंतर मंदिर शुद्धीकरणासाठी काही काळ बंद ठेवण्यात आले होते.