पर्यटन हंगामातच श्रीनगर विमानतळ बंद; कश्मिरच्या अर्थव्यवस्थेसमोर आव्हान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कश्मिरमध्ये पर्यटनाचा बहर असतानाच श्रीनगर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या तात्पुरत्या बंदची घोषणा करण्यात आली आहे. धावपट्टीच्या दुरुस्ती आणि सुधारणा कामांसाठी 1 ते 15 ऑक्टोबर 2026 या कालावधीत विमानतळावरील सर्व उड्डाणे पूर्णपणे बंद राहणार आहेत. या निर्णयामुळे हजारो प्रवाशांसह पर्यटन क्षेत्रालाही मोठा फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

विमानतळ प्रशासनाच्या नियोजनानुसार, धावपट्टी अधिक सुरक्षित आणि आधुनिक करण्यासाठी हे काम हाती घेण्यात येत आहे. त्यामुळे ऑक्टोबरमधील 15 दिवस कोणतेही विमान श्रीनगर विमानतळावर उतरू किंवा उड्डाण करू शकणार नाही.

यापूर्वीच या कामाची तयारी सुरू झाली असून जुलै ते सप्टेंबर या कालावधीत विमानसेवेवर टप्प्याटप्प्याने निर्बंध लागू केले जाणार आहेत. आठवड्यातील काही दिवस उड्डाणांच्या वेळापत्रकात बदल होणार असल्याने प्रवाशांना आगाऊ नियोजन करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. भारतीय हवाई दलाने जारी केलेल्या NOTAM (नोटीस टू एअरमेन) नुसार, धावपट्टीवरील कामामुळे विमानतळाच्या कार्यकाळातही कपात करण्यात आली आहे. सध्या विमानांची ये-जा सकाळी 8 ते सायंकाळी 5 या मर्यादित वेळेतच होत आहे. पूर्वी ही सेवा रात्री उशिरापर्यंत उपलब्ध होती. असे वृत्त टीव्ही 9 ने दिले आहे.

विशेष म्हणजे, विमानतळ बंद राहण्याचा कालावधी हा काश्मीरमधील पर्यटनासाठी अत्यंत महत्त्वाच्या हंगामात येत आहे. ऑक्टोबरमध्ये निसर्गसौंदर्याचा आनंद घेण्यासाठी तसेच दुर्गापूजा आणि इतर सणांच्या सुट्ट्यांमध्ये मोठ्या संख्येने पर्यटक काश्मीरला भेट देतात. त्यामुळे अनेक पर्यटक प्रवासाचे नियोजन बदलू शकतात किंवा बुकिंग रद्द करू शकतात, अशी भीती पर्यटन व्यवसायिकांनी व्यक्त केली आहे. हॉटेल चालक, ट्रॅव्हल ऑपरेटर्स आणि इतर व्यावसायिक संघटनांनी सरकारकडे या निर्णयाचा पुनर्विचार करण्याची मागणी केली आहे. विमानसेवा ठप्प झाल्यास स्थानिक अर्थव्यवस्थेवर परिणाम होईल आणि पर्यटनाशी संबंधित हजारो लोकांच्या उत्पन्नावर त्याचा थेट परिणाम होऊ शकतो, असे त्यांचे म्हणणे आहे.

मात्र, अधिकाऱ्यांच्या मते धावपट्टीची दुरुस्ती भविष्यातील सुरक्षित आणि सुरळीत विमानवाहतुकीसाठी आवश्यक आहे. त्यामुळे काही काळ गैरसोय झाली तरी दीर्घकालीन दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा ठरणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.