श्रीवल्ली आणि बाजीरावांकडे ‘गोड’ बातमी; नॅशनल पार्कात तीन बछड्यांचे आगमन

बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील श्रीवल्ली आणि बाजीराव या वाघांच्या जोडीने गोड बातमी दिली आहे. 17 मे रोजी टी-24 सी 2 या वाघिणीने चार बछडय़ांना जन्म दिला. यातील एक बछडा वाघिणीच्या अंगाखाली आल्याने दगावला, मात्र उरलेले तीन बछडे निरोगी असून श्रीवल्लीच त्यांची उत्तम काळजी घेत आहे. त्यामुळे सध्या त्यांना मानवी स्पर्शाची गरज नसल्याचे राष्ट्रीय उद्यानातील अधिकाऱयांनी सांगितले. दरम्यान, बछडय़ांच्या जन्मामुळे कर्मचाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

गेल्या वर्षी मार्चमध्ये श्रीवल्ली आणि बाजीराव या जोडीने 4 बछडय़ांना जन्म दिला होता. पुरेसे दूध न मिळाल्याने त्यातील तीन बछडे दगावले होते, मात्र एका बछडय़ाची राष्ट्रीय उद्यानातील कर्मचाऱयांनी उत्तम काळजी घेतल्याने तो बचावला. सध्या त्याला सफारीमध्ये सोडण्यात आले नसले तरी मोठय़ा पिंजऱयात फिरण्यासाठी सोडण्यात आले आहे.

सीसीटीव्हीच्या निगराणीखाली बछडे
सीसीटीव्हीच्या निगराणीखाली बछडे असून त्यांच्याकडे सातत्याने आमचे लक्ष आहे, असे अधिकाऱयांनी सांगितले. संजय गांधी उद्यानाचे संचालक जी. मल्लिकार्जुन, उपसंचालक रेवती कुलकर्णी, सहाय्यक वनसंरक्षक सुधीर सोनवले, सिंहविहारचे अधीक्षक निकेत शिंदे, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. विनया जंगले ही टीम बछडय़ांवर लक्ष ठेवून आहे.

आईच घेतेय बछडय़ांची काळजी
बछडय़ांनी अद्याप डोळेही उघडलेले नाहीत. तिघांची अर्धा ते पाऊण तासांच्या अंतराने दूध पिणे आणि झोपणे अशी दैनंदिन क्रिया सुरू आहे. एखादा बछडा अधिक वेळ झोपला तर वाघीणच त्याला अधूनमधून जागे करून काळजी घेत आहे. बछडय़ांची डोळे उघडण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यांचे डोळे अतिशय नाजूक आहेत. त्यामुळे सध्या तरी त्यांचे कोणतेही छायाचित्रे काढण्यात आले नाही, अशी माहिती पशुवैद्यकीय अधिकारी विनया जंगले यांनी दिली.

– बछडय़ांची काळजी श्रीवल्लीच घेत असल्याने त्यांना मानवी स्पर्शाची गरज नाही, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. वाघिणीला म्हशीचे मांस तसेच चिकन खायला देण्यात येत आहे.