
लॉकडाऊनच्या काळात आंबा बागायतदारांच्या मदतीकरीता एसटी पुढे आली आहे. परजिल्ह्यात आंबा वाहतूक करण्यासाठी एसटी महामंडळाने शेतकरी ते ग्राहक संकल्पना राबवत किसान रथ वाहतूक सेवा सुरु केली आहे. एसटीच्या माध्यमातून बागायतदारांना आता आंबा ग्राहकांपर्यंत पोहोचवता येणार आहे़.
शेतकरी ते ग्राहक संकल्पना यशस्वी करण्यासाठी एसटी महामंडळ सिंधुदुर्ग रत्नागिरी एसटी डेपो येथून दररोज एसटीचा किसान रथ धावणार आहे. रत्नागिरी, लांजा, राजापूर, देवरुख, चिपळूण यासह वेंगुर्ला, मालवण, देवगड, विजयदुर्ग, कुडाळ या डेपोतून आंब्याच्या पेट्या जमा करुन पनवेल, वाशी, ठाणे, कुर्ला, परेल, मुंबई सेंट्रल, बोरीवली या डेपोत आंबा पेट्या पोहोचवल्या जातील. रात्रीच्या वेळी बारा तासात आंबा मुंबईला रवाना होत असल्याने आंबा खराब होण्याची शक्यता नाही.
वाहतूकीमध्ये काही नैसर्गिक आपत्ती किंवा अपघातामुळे आंबा खराब झाल्यास विमा संरक्षण देण्यात येईल. मुंबईतील ग्राहकांना आपल्या आंब्याच्या पेट्या डेपोतूनच जमा कराव्या लागणार आहेत़. सर्व आंबा बागायतदारांनी आणि ग्राहकांनी मालवण, वेंगुर्ला, देवगड, विजयदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी, कणकवली, रत्नागिरी, लांजा, राजापूर, देवरुख, चिपळूण येथील आगाराशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.































































