
डिझेल दरात झालेली दरवाढ आणि टायरसह एसटीच्या इतर सुटय़ा भागांमध्ये झालेली दरवाढ पाहता एसटी महामंडळाने सोमवारी मध्यरात्रीपासून साडेसतरा टक्के भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. ही भाडेवाढ महामंडळाच्या सर्व प्रकारच्या प्रवासी वाहतूक सेवांना लागू होणार आहे. एसटीच्या तिकिटात किमान पाच रुपयांनी वाढ होणार असून रातराणीच्या गाडय़ांचे दर मात्र 5 ते 10 रुपयांनी कमी करण्यात आले आहेत.
गेल्या तीन वर्षांत डिझेलच्या दरात भरमसाट वाढ झाली आहे. दिवसेंदिवस हे दर वाढत असले तरी एसटी महामंडळाने प्रवासी भाडेदर मात्र स्थिर ठेवले होते. मात्र वाढत्या इंधन दराचा भार पेलत असताना दुसरीकडे महामंडळाच्या तिजोरीवरही त्याचा परिणाम जाणवू लागला असल्याने नाइलाजास्तव ही तिकीट दरवाढ करण्यात येत असल्याचे एसटी महामंडळाने म्हटले आहे. याआधी 15 जून 2018 रोजी 18 टक्के भाडेवाढ करण्यात आली होती. नव्या तिकीट दरवाढीनुसार साधी गाडी, शयन-आसनी, शिवशाही तसेच शिवनेरी व अश्वमेधच्या पहिल्या टप्प्यासाठी भाडेवाढ होणार नसून दुसऱया टप्प्यानंतर म्हणजेच 6 कि.मी. नंतर तिकिटाच्या दरात वाढ होणार आहे. ही दरवाढ 5 रुपयांच्या पटीत असून 25 ऑक्टोबर 2021च्या मध्यरात्री 12 वाजल्यापासून दरवाढ लागू होणार आहे. नाइलाजास्तव ही तिकीट दरवाढ करण्यात येत असल्याचे एसटी महामंडळाने म्हटले आहे.
रातराणीचा प्रवास स्वस्त झाला
25 ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून किंवा त्यानंतर प्रवास करणाऱया प्रवाशांकडून सुधारित दराने तिकीट आकारणी केली जाणार आहे. तसेच ज्या प्रवाशाने आगाऊ आरक्षण केले आहे अशा प्रवाशांकडून वाहक सुधारित तिकीट दरानुसार फरकेच्या रकमेची आकारणी करतील तसेच ज्या प्रवाशाचा दि. 25 ऑक्टोबर 2021 रोजी प्रवास सुरू होऊन तो दि. 26 ऑक्टोबर 2021ला किंवा त्यानंतर संपत आहे, अशा प्रवाशांकडून जुने व सुधारित प्रवासभाडे फरकाची रक्कम वसूल करू नये, असे महामंडळाने स्पष्ट केले आहे. रात्रीच्या साध्या बसेसचे तिकीट दर हे दिवसाच्या तिकीट दराच्या तुलनेत पूर्वी 18 टक्के जास्त होते. उद्यापासून सदर अतिरिक्त दर रद्द केले असून दिवसा व रात्री धावणाऱया बसेसचा तिकीट दर सारखाच असणार आहे. त्यामुळे साध्या बसचा रातराणीचा प्रवास तुलनेने स्वस्त झाला आहे.
मार्ग सेवा नवा दर
- दादर ते स्वारगेट शिवनेरी 525
- मुंबई ते अलिबाग साधी 160
- मुंबई ते दापोली साधी 340
- मुंबई ते कोल्हापूर साधी 565
- मुंबई ते संभाजीनगर साधी 860
- मुंबई ते नाशिक साधी 315


































































