सातारा विभागातील एसटी बससेवा पूर्ववत होण्याच्या मार्गावर, आठवडाभरात 300हून अधिक कर्मचारी कामावर हजर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नोव्हेंबरमध्ये सुरू झालेल्या एसटी कर्मचाऱयांचा संप काही प्रमाणात मिटला आहे. याबाबत उच्च न्यायालयाने निर्देश दिल्यानंतर सेवेत परतणाऱया कर्मचाऱयांची संख्या वाढत चालली आहे. त्यामुळे पाच महिन्यांपासून विस्कळीत झालेली एसटी सेवा पूर्ववत होणार आहे. दरम्यान, सातारा विभागात आठवडाभरात 300हून अधिक कर्मचारी कामावर हजर झाले आहेत.

दरम्यान, शासनाने कडक कारवाईचा इशारा दिल्यानंतरही एसटी कर्मचाऱयांचा संप मिटत नव्हता. मात्र, उच्च न्यायालयाचा आदेश व ऍड. गुणरत्न सदावर्ते यांना अटक होताच संप मिटण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे साताऱयासह विविध आगारांत आता मोठय़ा प्रमाणात कर्मचारी हजर होत आहेत. पुढील काही दिवसांत अजूनही कर्मचारी हजर होतील, अशी अपेक्षा एसटी महामंडळातील अधिकाऱयांनी व्यक्त केली.

एसटी महामंडळाचे राज्य शासनामध्ये विलीनीकरण करण्यात यावे, यासह विविध मागण्यांसंदर्भात एसटी कर्मचाऱयांनी गेल्या पाच महिन्यांपासून संप पुकारला होता. त्यामुळे जिह्यासह राज्यातील एसटी वाहतूक पूर्णपणे कोलमडली होती. तसेच एसटी कर्मचाऱयांनी न्यायालयातही धाव घेतली होती. उच्च न्यायालयात सुनावणी पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने कर्मचाऱयांना कामावर परतण्याचे निर्देश दिले होते. या आदेशानंतर कर्मचारी कामावर परतू लागले आहेत. आठवडाभराच्या कालावधीत जिह्यातील आगारांमध्ये सुमारे 300हून चालक, वाहक व यांत्रिकी कर्मचारी कामावर हजर झाले आहेत. तसेच बडतर्फ केलेल्या 100हून अधिक कर्मचाऱयांची अपिले दाखल करून घेण्यात येत आहेत. या अपिलांवर कर्मचाऱयांची सोमवारी विभागीय कार्यालयात सुनावणी होणार आहे.

दरम्यान, सर्व आगारांत कर्मचारी मोठय़ा संख्येने हजर होऊ लागले असल्याने लांब पल्ल्याच्या मार्गांवर धावणाऱया एसटी बसेससह ग्रामीण भागातील एसटी फेऱया पूर्ववत होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील प्रवाशांसह विद्यार्थ्यांची गैरसोय दूर होणार आहे.