
राज्यातील अवैध प्रवासी वाहतूकीला शिस्त लावण्याच्या नावाखाली सरकार ‘मॅक्सी कॅब’ला परवानगी देण्याच्या तयारीत आहे. परंतू मॅक्सी कॅबने एसटीचे उरले सुरले अस्तित्वही धोक्यात येईल असे एसटी प्रवासी संघटनांचे म्हणणे आहे. तसेच सरकार मॅक्सी कॅबवाल्यांकडून प्रवासी कर जमा करून महसूल जमा करेल परंतू अशा वाहनांतून प्रवास करणार्या प्रवाशांचा जर दुर्दैवाने अपघाती मृत्यू झाला तर त्यांच्या वारसांना एसटी प्रमाणे दहा लाखांची नुकसान भरपाई मिळणार आहे का ? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
एसटी महामंडळाच्या वाहनांतून गावखेड्यात दूरपर्यंत सेवा पुरविली जाते. परंतू आता सरकार अधिकृतपणे खाजगी वाहनांना टप्पा वाहतूकीची परवानगी देण्याचा विचार करीत असून त्यासाठी समिती नेमण्यात आली आहे. राज्य सरकारने मॅक्सी कॅब धोरणाचा अभ्यास करण्यासाठी अतिरिक्त पोलिस महासंचालक (वाहतूक) यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे. परंतू राज्य मार्ग परिवहन महामंडळ कायदा 1950 अन्वये टप्पे प्रवासी वाहतूक करण्याचे अधिकार केवळ महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाला दिले आहेत. तरीही राज्यात सरकारी परवानगीने तसेच विनापरवानगी लाखो वाहनांद्वारे अवैध प्रवासी वाहतूक केली जाते.
सरकार नुकसान भरपाई देणार का ?
काही खाजगी वाहने टप्पा वाहतूक करीत असून अवैधपणे प्रवाशांना कोंबून त्यांचा जीव धोक्यात घालत असतात. तरूणांना रोजगार व सरकारला महसूल मिळेल या नावाखाली मॅक्सी कॅब धोरणाला परवानगी देण्याचा विचार राज्य सरकार करीत आहे. परंतू खाजगी वाहनातून प्रवास करणार्या प्रवाशाच्या जिवितास धोका निर्माण झाला तर त्याची नुकसान भरपाई सरकार देणार आहे का ? असा सवाल केला जात आहे.



























































