
सामना प्रतिनिधी । संभाजीनगर
वेतनवाढीच्या प्रश्नावर एसटी कर्मचाऱ्यांनी दोन दिवस पुकारलेल्या अनधिकृत संपामुळे संभाजीनगर विभागातील ३ हजार १०७ फेऱ्या रद्द झाल्याने महामंडळाचे तब्बल ६० लाख ५३ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. या दोन दिवसात विभागातील ८ आगारातील १ हजार ८५८ कर्मचाऱ्यानी संपात सहभाग घेतला होता. यामध्ये प्रशासकीय कर्मचाऱ्याचा सहभाग होता. लाखो रुपयांचे झालेले नुकसान आणि अनधिकृत संपात सहभाग घेतल्याने आता संपकरी कर्मचाऱ्यावर काय कारवाई केली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
एसटी महामंडळाच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून कर्मचाऱ्यांसाठी वेतन करार जाहीर केला, मात्र कर्मचाऱ्यांनी ७ जून रोजी मध्यरात्रीपासून अचानक संप पुकारला. ८ रोजी रोजी सकाळपासून या संपाचा परिणाम दिसून आला. ९ जून रोजी अनेक कर्मचाऱ्यांनी या संपात उड्या घेतल्याने दोन दिवसात या अनधिकृत संपात सहभागी होणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या १ हजार ८०० झाली होती. त्यामुळे या दोन दिवसात विभागातील ३ हजार १०० फेऱ्या रद्द झाल्या. एवढ्या मोठ्या प्रमाणावर फेऱ्या रद्द झाल्याने महामंडळाला तब्बल ६० लाख ५३ हजारांचे नुकसान सोसावे लागले.
जिल्ह्यातील ८ आगारात प्रशासकीय, यांत्रिकी आणि चालक -वाहक असे २ हजार ५०३ कर्मचारी कार्यरत आहेत. दोन दिवसांच्या संपात ७ जून रोजी ५ आगारातील कर्मचाऱ्यांचा संपात सहभाग नगण्य होता. ८ जून रोजी बहुतांश कर्मचाऱ्यांनी या संपात सहभाग घेतला होता. त्यामुळे या दिवशी प्रवासी सेवेवर मोठा परिणाम झाला होता.
एसटी महामंडळाच्या महाव्यवस्थापकांनी दोन दिवसांपूर्वी संपात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांची एक दिवसाला आठ दिवस याप्रमाणे वेतन कपात करण्याचे आदेश दिलेले आहेत. दरम्यान, विभागातील झालेले नुकसान, कर्मचाऱ्यांचा संपात असलेला सहभाग यानुसार संपकऱ्यांचे वेतन एकास आठ दिवस याप्रमाणे कपात करायचे किंवा संप केलेल्या दिवसाचे वेतन कपात करायचे याचा निर्णय घेण्याचे अधिकार संबंधित विभाग नियंत्रकांना देण्यात आले आहेत. संभाजीनगर विभागाचे विभाग नियंत्रक प्रशांत भुसारी सध्या सुटीवर असल्याने संपकरी कर्मचाऱ्यांवर कारवाईसंदर्भात अद्याप निर्णय झालेला नाही.

































































