अखेर आजऱ्यात फलाटावर लागली एसटी, 10 कर्मचारी सेवेत रुजू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आठवडी बाजाराचा मुहूर्त साधत सर्वसामान्यांची ‘लाल परी’ अखेर आजऱयाच्या फलाटावर लागली. त्यामुळे प्रवाशांकडून समाधान व्यक्त होत आहे. आठ-दहा कर्मचारी संप सोडून कर्तव्यावर हजर झाल्याने काही मार्गांवर आज ‘लाल परी’च्या फेऱया सुरू करण्यात आल्याचे आजरा बस स्थानकाच्या नियंत्रण कक्षातून सांगण्यात आले.

वेतनवाढीसह शासनाकडे विलीनीकरण करण्याच्या मागणीवर राज्यभरातील एसटी कर्मचारी संपावर आहेत. विशेषतः दिवाळी संपताच सुरू झालेल्या संपामुळे येथील बस स्थानकातून ‘लाल परी’ जणू गायबच झाल्याचे चित्र ठळक झाले होते. येथील सर्वच कर्मचारी संघटना संपात उतरल्याने एकही बसफेरी होऊ शकली नाही. परिणामी, आजरा आगारातील सर्व एसटी बसेस डेपोमध्ये लावण्यात आल्या होत्या. तर, डेपोनजीकच्या दत्त मंदिराजवळच संपकऱयांनी तंबू रोवला होता. 26 दिवस हे चित्र बदलले नव्हते. शासकीय स्तरावर होणाऱया चर्चांकडे सर्व कर्मचारी डोळे लावून होते; पण पाय माघारी वळले नव्हते. त्यामुळे स्थानकात शुकशुकाट होता. काहीजण येथे क्रिकेतही खेळत होते. काही खासगी वाहने लावली जात होती; पण ‘लाल परी’ या चित्रात दिसत नव्हती.

अखेर आज येथून स्टार्टर मारून ‘लाल परी’ मोठय़ा दिमाखात गाव परिसरात निघाली, तेव्हा अनेकांनी समाधान व्यक्त केले. आज गडहिंग्लज, देवकांडगाव, गवसे, नेसरी मार्गांवर बसफेऱया सुरू झाल्या. शासनाच्या निलंबनाच्या इशाऱयामुळे काहीजण कर्तव्यावर उपस्थित झाल्याचे आगारप्रमुख पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले. तसेच येत्या काही दिवसांत कामावर हजर होणाऱया कर्मचाऱयांच्या संख्येनुसार बसफेऱया सुरू करण्यात येणार आहेत. शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची यामुळे मोठी सोय होणार आहे.