
सामना प्रतिनिधी । महाड
रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्यभिषेक सोहळा याचि देही याची डोळा पाहण्यासाठी हजारो शिवभक्त राज्याच्या कानाकोपऱ्यातून आज रायगडावर जमा झाले. परंतु या सोहळ्याला गालबोट लागले आहे. शिवराज्याभिषेक सोहळा आटोपून पायर्यांनी खाली उतरताना महादरवाजाजवळ शिवभक्तांची कोंडी झाली. महादरवाजा येथून बाहेर पडल्या नंतर अंगावर दरड पडल्याने एका शिवभक्ताचा मृत्यू झाला, तर अनेक जण जखमी झाले आहेत. अशोकदादा उंबरे (वय – २३, रा.उस्मानाबाद असे मृत शिवभक्ताचे नाव आहे. दरम्यान, गर्दीमुळे खाली उतरायला संधी नसल्याने पायर्यांवर हजारोंच्या संख्येने शिवभक्त अस्वस्थ अवस्थेत ठाण मांडून बसले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा साजरा करण्यासाठी हजारो शिवभक्त जमा झाले. राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या या शिवभक्तांच्या उपस्थित राज्याभिषेक सोहळा उत्साहात पार पडला. दरबारातून शिवरायांची पालखी निघाली तेव्हा जय भवानी जय शिवाजीच्या घोषणांनी रायगड दणाणून गेला होता. परंतु राज्याभिषेक सोहळा संपल्यानंतर माघारी परतण्यासाठी शिवभक्तांनी एकच गर्दी केली. महादरवाजा येथून बाहेर पडल्या नंतर अंगावर दरड पडल्याने एकाचा मृत्यू झाला, तर अनेक जण जखमी झाले आहेत.



























































