स्टॅण्डआऊट – इन द क्राउड

436

>> नीलांबरी जोशी 

पराग कॉलेजमध्ये असताना त्याला संगीताची खूप आवड होती. पदवी मिळाल्यानंतर तो सॉफ्टवेअर इंजिनीअर या पदावर एका बहुराष्ट्रीय कंपनीत नोकरी करायला लागला. प्रोग्रॅमिंगमधलं कोडिंग त्याला उत्तम जमायचं. तसंच तो कष्टाळू आणि विश्वासू होता. त्यामुळे तो थोडय़ाच काळात टीम लीडर झाला. ते कामही त्यानं उत्तम सांभाळलं. नवीन टीम मेंबर आला आणि त्याला एखादी गोष्ट समजत नसेल तर काहीजण खूप अस्वस्थ होतात. पण पराग मात्र समोरच्या माणसाला एखादी गोष्ट समजायला जितकं अवघड जात असेल तितका शांत होत जायचा. त्या माणसाला समजेल अशा भाषेत आणि अशा वेगात तो ती गोष्ट समजावून सांगायचा. त्याच्या टीममध्ये तो प्रिय होता. मग त्याला अजून बढती मिळाली आणि तो प्रोजेक्ट मॅनेजर झाला.

आता त्याला एक संपूर्ण प्रोजेक्ट चालवायचा होता. यात लागणाऱया स्ट्रेंग्थ वेगळय़ा होत्या. या कामात प्रोजेक्टची आखणी करणं, त्यानुसार तयार होणारं प्रोजेक्ट चालेल का हे तपासणं आणि प्रोजेक्टच्या दरम्यान गरज पडली तर परत पुनर्रचना (रिडिझाईन) करणं गरजेचं होतं. तसंच यात ग्राहकाला सांभाळण्याची महत्त्वाची भूमिकाही निभवायची होती. परागनं ही कामं करायचा जिवापाड प्रयत्न केला, पण ते त्याला जमलं नाही. परागसारखे अनुभव कोणालाच नवीन नाहीत. करीअर निवडताना त्या करीअरमध्ये काय काम करणं अपेक्षित आहे आणि कर्मचाऱयाच्या स्ट्रेंग्थ ते काम करण्यासाठी जुळतात का पाहणं यासाठीच महत्त्वाचं आहे. यासाठी कंपनीत नोकरभरती करताना व्यक्तिमत्त्वाच्या चाचण्या कामाला येतात. या चाचण्यांमधून मिळालेल्या निष्कर्षांमुळे उमेदवाराच्या काँपिटन्सीज, समस्या सोडवण्याकडे असलेला कल, त्याच्यातली व्यवस्थापनाची कौशल्ये अशा अनेक गोष्टी कळू शकतात. वैयक्तिक पातळीवर एखादा माणूस मनानं कमकुमवत आहे का खंबीर आहे, निर्णयक्षम आहे का नाही अशा अनेक गोष्टी कळतात. कंपनीला नोकरभरतीचे निर्णय घ्यायला भरभक्कम मदत होते.

अशीच एक चाचणी मार्कस बकिंगहॅम यानं स्टँडआऊट-2.0 या नावानं विकसित केली आहे. आपल्या स्वतःच्या आणि आपल्या टीमच्या स्ट्रेंग्थ ओळखून परफॉर्मन्स वाढवण्यासाठी सल्लागार (ऍडव्हायझर), लोकं जोडणारा (कनेक्टर), सृजनशील (क्रिएटर), समेट घटवून आणणारा (इक्वलायझर), प्रभावी (इनफ्लुएन्सर), शोधवृत्तीचा (पायोनियर), मदत करणारा (प्रोव्हायडर), विचारप्रवृत्त करणारा (स्टिम्युलेटर), शिक्षकी बाण्याचा (शिक्षक) अशा 9 स्ट्रेंग्थ गरजेच्या असतात. त्या ओळखायच्या कशा, यासाठी स्टँडआऊट-2.0 ही एक ऑनलाइन चाचणी उपलब्ध आहे.

‘स्टँडआऊट’ ही व्यक्तिमत्त्व चाचणी नावीन्यपूर्ण आहे. आज निरनिराळय़ा प्रकारे व्यक्तिमत्त्वाच्या चाचण्या घेतल्या जातात. त्या प्रत्येक चाचण्यांचे निष्कर्ष वेगवेगळय़ा दृष्टिकोनातून काढले जातात. उदाहरणार्थ, कर्मचाऱयांच्या बाबतीत त्याचा आत्मविश्वास, त्याची ‘स्व’ची जाणीव, त्याची काम पूर्ण करायची तळमळ, टीमला सांभाळून घेणं अशा गोष्टी वेगवेगळय़ा चाचण्यांमधून तपासता येतात. पण या सगळय़ा गुणदोषांचा एकमेकांशी काय संबंध आहे ते जाणून निष्कर्ष काढला जात नाही. खरं तर या सगळय़ा गोष्टी मिळून एक व्यक्तिमत्त्व तयार होतं आणि त्या एकत्रित गुणदोषांचा समुच्चय आपण त्या व्यक्तीमध्ये पाहतो.

या चाचणीत असा गुणांचा समुच्चय करून त्याला नऊ प्रकारांमध्ये विभागलं आहे. उदाहरणार्थ, एखादा माणूस मनमिळाऊ आहे, तो लोकांकडून नीट काम करून घेतो, हसतखेळत काम करतो, पण गरजेनुसार आक्रमकही होतो असं आपण एखाद्याचं वर्णन करतो. अशा व्यक्तिमत्त्वाला इनफ्लुएन्सर म्हणता येतं.

या नऊ स्ट्रेंग्थचे पैलू आणि विश्लेषण मजेशीर आहे. उदाहरणार्थ, ‘ऍडव्हायझर’ हा प्रॅक्टिकल, ठोस विचार करणारा, लोकांच्या समस्या सोडवण्यात अग्रेसर असतो. टप्प्याटप्प्यांमध्ये समस्येचा विचार करायला त्याला आवडतं. गुंतागुंतीच्या समस्या सोडवताना तो एकाग्र असतो. इतर विद्वान लोकांबद्दल त्याला आदर असतो. ‘कनेक्टर’ मध्यस्थाची भूमिका उत्तम निभावतो. दोन माणसं किंवा दोन संकल्पना यांना एकत्र आणून त्यातून काहीतरी भव्यदिव्य निर्माण करणं किंवा आहे त्यापेक्षा चांगलं काहीतरी करणं यात तो हुशार असतो. ‘क्रिएटर’ला गोष्टी जास्त रचनात्मक आणि चांगल्या पद्धतीत कशी पुढे नेता येतील ते दिसतं. त्याला एखाद्या घटनेत खोलवर काय लपलं आहे याची जाण असते. निरीक्षणशक्ती आणि इनसाईट ही ‘क्रिएटर’ची वैशिष्टय़े आहेत.

‘इक्वलायझर’ हा सतत भावनिक तोल सांभाळणारा, स्थिर बुद्धीचा, अस्थिर प्रसंगात खोलवर जाऊन निर्णयापर्यंत पोचणारा असतो. लोकांना विचारात स्पष्टता हवी असते तेव्हा ते या लोकांकडे सल्ला मागतात. ‘पायोनियर’ला जग मैत्रीपूर्ण आहे आणि कोपऱयाकोपऱयावर चांगलं काहीतरी घडेल अशी संधी उपलब्ध आहे असं वाटतं. पुढाकार घेऊन पहिलं पाऊल आपल्यालाच टाकायला हवं याची त्याला सतत जाणीव असते. वाटेत अडथळे येणार आणि आपण पुढे जायचं याबाबतीत याला शंकाच नसते. ‘प्रोव्हायडर’ हा लोकांच्या भावना समजून घेणारा आणि त्यांचं म्हणणं ऐकून त्यावर उत्तरं शोधणारा असतो. ‘स्टिम्युलेटर’ प्रकारातली स्वतः भावनिक असणारी ही माणसं लोकांच्या भावना समजून त्यांच्यात बदल घडवून आणू शकतात. सर्वजण यांच्यापाशी आपलं अंतःकरण मोकळं करतात. ‘टीचर’ प्रकारातल्या माणसांना समोरच्या माणसातल्या क्षमता पाहून अत्यानंद होतो. त्या क्षमतांना वाट मिळवून देण्यात त्यांना समाधान लाभतं.

‘इनफ्लुएन्सर’ प्रकारातल्या लोकांचं जवळपास प्रत्येक परिस्थितीत काय घडायला हवं इकडे लक्ष असतं. त्यादृष्टीनं समोरच्या माणसाला प्रवृत्त करून काम कसं पूर्ण होईल हे ते बघतात. मीटिंग असू दे किंवा एखाद्या सहकाऱयाला मदत करणं असू दे किंवा मित्राला दुःखद प्रसंगात धीर देणं असू दे, समोरच्या माणसानं सहजपणे एरवी जे केलं नसतं ते त्याच्याकडून कसं करून घेता येईल याकडे यांचं लक्ष असतं. समोरच्या माणसाला कृती करायला लावणं हे या प्रकाराचं वैशिष्टय़ आहे.

माणसानं आपल्या क्षमता ओळखून स्वतःला घडवणं हे त्याचं सर्वात प्रमुख काम आहे. त्याच्या या कामाचं फलित म्हणजे माणसाचं स्वतःचं व्यक्तिमत्त्व!’ असं एरिक फ्रॉम हा मानसशास्त्रज्ञ म्हणतो. त्याकडे वाटचाल करण्यासाठी स्टँडआऊटचा उपयोग होऊ शकेल.

[email protected]

 

आपली प्रतिक्रिया द्या