SBI ने दिली खुशखबर, व्याजदरात कपात केल्याने कर्ज झाले स्वस्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लॉकडाऊन काळात उद्योग धंदे बंद असून यामुळे तणावात असणाऱ्या खातेधारकांना ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’ने (एसबीआय) खुशखबर दिली आहे. बँकेने एमसीएलआरवर आधारित कर्जाच्या व्याजदरात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. एसीबीआयने व्याज दरात 0.15 टक्के कपात केली आहे. त्यामुळे आता नवीन व्याजदर 7.25 टक्के झाला आहे, जो पूर्वी 7.40 टक्के होता. सलग 12 व्यादा व्याज दरात कपात केल्याचे बँकेने म्हटले आहे.

बँकेच्या या निर्णयामुळे लाखो कर्जदारांना फायदा होणार असून EMI अर्थात हप्त्याची रक्कम घटणार आहे. 10 मे पासून नवीन व्याजदर लागू होणार आहेत. याआधी बँकांची बँक ‘रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया’ने (आरबीआय) अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी मार्च महिन्यात रेपो रेटमध्ये 0.75 कपात केली होती. तसेच एप्रिल महिन्यातही 0.35 टक्के कपात करण्यात आली होती. त्यामुळे बँकांना आपला व्याजदर घटवावा लागला. यामुळे EMI चे टेन्शन असणाऱ्या कर्जदारांना थोडा दिलासा मिळाला आहे.

तत्पूर्वी सार्वजनिक क्षेत्रातील मोठी बँक ‘इंडियन ओव्हरसिस बँक’ (आयओबी) आणि ‘बँक ऑफ महाराष्ट्र’ने (बीओएम) व्याज दरात कपात केली होती. आयओबीने व्याज दरात 0.10 टक्के कपात केली असून व्याजदर 8.15टक्के केला आहे. 10 मे पासून नवीन दर लागू होणार आहे. तर पुणे स्थित बीओएमने देखील व्याज दर 0.10 टक्के कमी केला असून यो आता 7.90 टक्के झाला आहे.