महिलांना आजपासून लोकल प्रवासाची मुभा द्या, राज्य सरकारचे रेल्वेला विनंतीपत्र

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आजपासून नवरात्रोत्सवाला सुरुवात होत असतानाच राज्य सरकारने महिलांना खूशखबर दिली आहे. उद्या शनिवारी 17 ऑक्टोबरपासून सरसकट सर्व महिलांना लोकल प्रवासाची परवानगी राज्य सरकारने दिली असून तसे पत्र रेल्वे बोर्डाला पाठविले आहे. महिलांना प्रवासाची मुभा देताना लोकलच्या फेऱया वाढविण्यात याव्यात अशी विनंतीही सरकारने रेल्वेला केली आहे.

या वेळेत प्रवास करता येणार

सकाळी 11 ते दुपारी 3 व संध्याकाळी 7 ते लोकलसेवा सुरू असेपर्यंत महिलांना लोकलमधून प्रवास करता येणार आहे. मुंबई आणि एमएमआरमध्ये ही मुभा असेल.तसेच त्यासाठी क्यूआर कोड काढण्याचीदेखील आवश्यकता असणार नाही. तिकिट काढून प्रवास करता येणार आहे.

रेल्वे बोर्ड म्हणते जरा थांबा मीटिंग घेतो नंतर निर्णय देतो…
मुंबई उपनगरीय लोकलमध्ये सरसकट सर्व महिला प्रवाशांना नॉन पिकअवरमध्ये उद्यापासून प्रवेश देण्याची मागणी राज्य सरकारने रेल्वे बोर्डाकडे केली आहे. परंतु एरव्ही राज्य सरकारने मागणी करताच परवानगी देणाऱया रेल्वेने नवाच पवित्रा घेतला आहे. रेल्वेने लागलीच अशी परवानगी देता येणे शक्य नसल्याचे म्हटले आहे. यासाठी आधी राज्य सरकारशी मीटिंग घ्यावी लागेल तसेच योग्य उपाय योजना कराव्या लागतील. मग रेल्वे बोर्डाची अंतिम मंजुरी घ्यावी लागेल. त्यानंतर महिलांना लोकल प्रवेश देता येईल असे मध्य आणि पश्चिम दोन्ही रेल्वेनी रात्री जाहीर केले.